google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

मुख्यमंत्र्यांच्या 2 लाख रोजगाराच्या दाव्याला काँग्रेसचे थेट आव्हान

पणजी :
एनआयटी, आयआयटी, बिट्स पिलानी, आयुर्वेद संस्था, युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये किती गोमंतकीयांना नोकऱ्या मिळाल्या? किती कायमस्वरूपी आहेत, किती तात्पुरत्या आहेत, किती आउटसोर्स एजन्सीद्वारे आहेत? मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना थिवीं खाजगी विद्यापीठाला विरोध करू नये असा सल्ला देण्यापूर्वी या प्रश्नांचे उत्तर द्यावे, अशी मागणी  काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी  गोव्यातील तथाकथित 2 लाख नोकऱ्यांच्या संधींविषयी तपशीलवार माहिती जाहीर करण्याचे धाडस दाखवावे. गोव्यातील नोकऱ्या बाहेरचे लोक येवून बळकावतील अशी धमकी  देण्याऐवजी केवळ गोमतकीयांचीच सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात भरती व्हावी यावर सरकारने उपाययोजना करावी असे अमरनाथ  पणजीकर म्हणाले.

मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की एनआयटी, कुंकळ्ळी मधील १९५ नोकऱ्यांपैकी फक्त १३० गोमंतकीय असून त्यापैकी फक्त १५ नियमित आणि ११२ आउटसोर्स केलेल्या एजन्सीमार्फत तात्पुरत्या पद्धतीवर काम करीत आहेत. फार्मगुडी येथील आयआयटी मध्ये, ३२९ नोकऱ्यांपैकी फक्त १४० गोमंतकीय आहेत आणि त्यापैकी फक्त १४ नियमित आहेत, असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.

धारगळ येथील आयुष हॉस्पिटलमध्ये २२० नोकऱ्या आहेत त्यापैकी २०४ गोमंतकीय केवळ कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सदर इस्पितळाला सरकारने ५० हजार चौरस मीटर जागा दिली, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्चला सरकार ५० एकर जमीन देऊ इच्छित आहे. या संस्थेकडे फक्त ४४ नोकऱ्या आहेत ज्यात ११ गोमंतकीय कंत्राटी तत्वावर काम करतात. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ३७८ नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यापैकी ५३ गोमंतकीय नियमितपणे, ४३ कंत्राटी पद्धतीने आणि १९६ थर्ड पार्टी एजन्सीद्वारे कार्यरत आहेत, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे थिवीं  येथील खाजगी विद्यापीठ रोजगार निर्मिती करेल हे विधान चुकीचे, दिशाभूल करणारे आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन महामंडळाने मंजुरी दिलेल्या प्रकल्पाना सुमारे १२ लाख चौरस मिटर जागा दिली. सदर प्रकल्पानी ६६५० कोटीची गुंतवणूक आणण्याचा दावा केला होता परंतू प्रत्यक्षात ९५१ कोटीच गुंतवणूक आली आहे. या प्रकल्पानी सरकारला २४३०० रोजगार तयार होणार असल्याचे सादरीकरण केले होते, मात्र केवळ २५०५ जणांनाच रोजगार मिळाला. गोवा आयपीबीनेच थिवींच्या युनिव्हर्सिटीला मान्यता कशी व कोणत्या आधारावर दिली हे पाहणे महत्वाचे आहे.

आज भाजप सरकारकडे रोजगार व नोकऱ्या तयाक करण्याचा कृती आराखडा नाही. मागील बारा वर्ष सरकार खोटी आश्वासने देवून शिक्षीत तरुणांना फसवीत आहे असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!