‘म्हादईचा व गोव्याचा हितासंबंधीचे निर्णय घेण्यात कुचराई’
मडगाव :
गोव्याचे हित जपण्याचे दुहेरी इंजिन सरकारचे दावे पोकळ आहेत. भाजप सरकारकडून केवळ राजकीय स्वार्थासाठी म्हादईचा व गोव्याचा हितासंबंधीचे निर्णय घेण्यात कुचराई होत आहे, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले.
कळसा भांडुरा प्रकल्पाबाबत कर्नाटक विधानसभेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोव्याचे हीत जपण्यात राज्य सरकार कमी पडल्याची टीका केली तसेच हा केवळ राजकीय स्वार्थासाठी गोव्याचा बळी देण्याचा प्रकार असल्याचे म्हटले. मुख्यमंत्र्यांनी म्हादईवरील राजकीय मतभेद बाजूला ठेवत तातडीने सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व पंतप्रधानांकडे न्यावे, अशी मागणी युरी यांनी केली. ही मागणी आधीही केली होती पण नेहमीप्रमाणे ती दुर्लक्षित करण्यात येऊ नये.
सरकारने म्हादईसंदर्भातील सर्व कागदपत्रे विधानसभेत सभागृहासमोर ठेवावीत. म्हादईसाठी पूर्ण दिवस देत अधिवेशन वाढवणे गरजेचे आहे. झुआरी ब्रिज ही गोव्याला ख्रिसमसची भेट आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वक्तव्य केले. गोव्याची जीवनवाहिनी म्हादईला होणारा धोका आणि कायमस्वरूपी नुकसान लक्षात घेत याबाबत कौतुक करता येणार नाही. झुआरी ब्रिजवर सेल्फीमध्ये रमण्याची ही वेळ नाही. तर गोव्याची जीवनदायिनी वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आहे असे युरी आलेमाव म्हणाले.