मडगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात खंडणीबहाद्दर संकल्प आमोणकर यांच्यासोबत व्यासपिठावर बसलेले देशवासीय पाहणार आहे. भारतीय संविधानाचा खुन करणारे दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, मायकल लोबो, डिलायला लोबो, रुदोल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई आणि केदार नाईक यांच्यासोबत बसलेले नरेंद्र मोदी आज देश बघणार आहे, असा जबरदस्त टोला काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी हाणला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनाच्या काही तास अगोदर आपल्या समाजमाध्यमांवरून गोव्याशी संबंधीत विवीध समस्या व विषय उपस्थित करुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी मोदीना घेरण्याचा प्रयत्न केला.
गोव्याची जीवनदायीनी आई म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकच्या कळसा भांडुरा प्रकल्पाला दिलेली मंजुरी मागे घेण्याच्या अधिसूचनेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात येण्याची गोमंतकीय वाट पाहत आहेत, असे अमित पाटकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यावरणाचा नाश करणारे तीन रेषीय प्रकल्प रद्द करण्याची आणि मुरगाव बंदर तात्काळ कोळसामुक्त करण्याची घोषणा करतील का याची गोमंतकीय आतुरतेने वाट पाहत आहेत असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
आज गोमंतकीय पंतप्रधान नरेंद्र मोदी 150 कोटींचा धनादेश घेऊन येण्याची वाट पाहत आहेत. गोवा मुक्ति लढ्याची 60 वर्षे साजरी करण्यासाठी केंद्र सरकारने गोव्याल 300 कोटी देण्याचे वचन दिले होते. परंतू, आजपर्यंत केवळ 150 कोटीच गोवा सरकारला मिळाले. जर पंतप्रधान ही रक्कम आणण्यात अयशस्वी झाले, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अर्थमंत्र्यांचे त्यांनी मानलेले आभार मागे घेतील असा चिमटा अमित पाटकर यांनी काढला.
नोकरीच्या संधीची आतुरतेने वाट पाहत असलेल्या सुमारे 1.20 लाख गोव्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांचे नियुक्तीचे पत्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणण्याची गोवा उत्सुकतेने वाट पाहत आहे असे सांगून अमित पाटकर यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला.
गोव्यात होत असलेल्या मोठ्या जमीन रुपांतरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली भूमिका स्पष्ट करतील याची गोवा वाट पाहत आहे. गोवा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आम्ही गोमंतकीयांना जमीन रुपांतरणावर निर्बंध लादण्याचे वचन दिले आहे असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगून, पंतप्रधानांच्या उत्तराची मागणी केली आहे.
गोमंतकीयांतर्फे आपण उठविलेल्या मुद्द्यांची दखल घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गोव्याच्या भवितव्याबद्दल योग्य स्पष्टीकरण देतील अशी मी आशा बाळगतो असे अमित पाटकर म्हणाले.