google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

शिक्षण, रोजगार, बेकारी भत्ता देण्यात डबल इंजिन’ अयशस्वी: इंडिया आघाडी

पणजी:

डबल इंजिनचे सरकार राज्यात रोजगार निर्माण करण्यात आणि बेरोजगारी दूर करण्यातही अपयशी ठरल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी केला.


काँग्रेसचे मीडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांच्यासह आप नेते रामाराव वाघ आणि शिवसेना नेते (यूबीटी) जितेश कामत यांनी पत्रकार परिषद घेऊन बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भाजपवर टिका केली.


“हे डबल इंजिन जुमला सरकार म्हणून ओळखले जाते. दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. गोवा सरकारनेही हजारो नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. मात्र दोन्ही सरकारे अपयशी ठरली आहेत. तथापि, आम्ही इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर 30 लाख सरकारी नोकऱ्या भरण्याचे वचन देतो,” असे पणजीकर म्हणाले.


ते म्हणाले की 2012 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने युवकांना बेकारी भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु गेल्या 12 वर्षांपासून ते देण्यात अपयशी ठरले.


“1.38 लाख तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. यावरून राज्यात बेरोजगारी असल्याचे सिद्ध झाले आहे. गोव्यात बेरोजगारी वाढत असल्याचे निती आयोग आणि सीएमआयई  यांनीही म्हटले आहे. पण सरकार काहीच करत नाही,” असे पणजीकर म्हणाले.


ते म्हणाले की, भाजपने ‘इंडस्ट्रियल प्रमोशन बोर्ड’ आणले असून त्यातून रोजगार निर्माण होईल असे सांगितले होते. ‘‘यातून केवळ एक हजार नोकऱ्या निर्माण झाल्या. परंतु सरकार त्याचा डेटा देत नाही कारण बहुतेक नोकऱ्या बाहेरच्या लोकांना दिल्या गेल्या असतील,” असे ते म्हणाले. या मंडळाने 17 हजार नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते असे ते म्हणाले.


सरकारने आमच्या जमिनी उद्योगांसाठी दिल्या, पण रोजगार निर्माण करण्यात अपयश आले, असा आरोप पणजीकर यांनी केला.

‘‘4 कोटी रुपये खर्चून मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात आला होता. सुमारे 22 हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज केले होते, त्यापैकी केवळ 500 जणांनाच नोकऱ्या मिळाल्या,” असे ते म्हणाले.


“भाजपकडे नोकऱ्या निर्माण करण्याची दृष्टी नाही, फक्त ‘मिशन टोटल कमिशन’ची दृष्टी आहे,” असे पणजीकर म्हणाले.

रामराव वाघ म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात सुविधा देण्यात शासन अपयशी ठरले आहे. “या सरकारने शिष्यवृत्ती बंद केली आहे आणि शाळांमध्ये सुविधा देण्यात अपयशी ठरले आहे,” ते म्हणाले.

भाजपने काँग्रेसच्या राजवटीच्या तुलनेत शैक्षणिक क्षेत्रातील अर्थसंकल्प कमी केला आहे.

“भाजपने शिक्षणात भगवेकरण आणले आहे आणि भगव्याचे नवे अध्याय आणले आहेत,” असे वाघ म्हणाले.

जितेश कामत म्हणाले की, भाजप शिक्षणात आणि नोकऱ्या निर्माण करण्यातही अपयशी ठरला आहे. “भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपो यांनी राज्यात बेरोजगारी असल्याचे मान्य केले आहे. गोव्यात बेरोजगारी असल्याचे यावरूनच सिद्ध होते,” असे ते म्हणाले.

कामत म्हणाले की, भाजपची धोरणे स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात आणि रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरली आहेत.

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकांना आवाहन केले की त्यांनी या मुद्द्यांवर विचार करावा आणि भाजपला लोकांची फसवणूक करण्यापासून रोखावे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!