अर्थमत/ टेक्नॉलॉजी

व्हॉट्सॲपच्या ‘युझरनेम’ फीचरला केंद्राची स्थगिती

मेटाला तीन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश

नवी दिल्ली : व्हॉट्सॲपवर मोबाईल क्रमांकाऐवजी ‘युझरनेम’च्या माध्यमातून संवाद साधण्याची सुविधा भारतात लागू करण्यास केंद्र सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या नव्या सुविधेमुळे सायबर फसवणूक, फिशिंग आणि बनावट ओळख निर्माण करून होणाऱ्या गुन्ह्यांना चालना मिळू शकते, अशी चिंता व्यक्त करत केंद्राने मेटा कंपनीला नोटीस बजावली असून, तीन दिवसांत सविस्तर खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्र सरकारने या सुविधेबाबतची सल्लामसलत आणि कायदेशीर पडताळणी पूर्ण होईपर्यंत भारतात ‘युझरनेम’ फीचर लागू करू नये, असे स्पष्ट केले आहे. सरकारच्या मते, मोबाईल क्रमांक न उघड करता संवाद साधण्याची सुविधा गोपनीयतेच्या दृष्टीने उपयुक्त असली, तरी तिचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मेटाने २९ जून रोजी व्हॉट्सॲपवर ‘युझरनेम’ सुविधा आणण्याची घोषणा केली होती. या सुविधेमुळे वापरकर्त्यांना स्वतःचा स्वतंत्र युझरनेम तयार करता येणार असून, मोबाईल क्रमांक न देता इतरांशी संपर्क साधता येणार आहे. कंपनीने हा बदल वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.

मात्र, केंद्र सरकारने भारतात व्हॉट्सॲपचे ५० कोटींहून अधिक वापरकर्ते असल्याचे नमूद करत, या सुविधेमुळे सरकारी संस्था, बँका, कंपन्या किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावासारखी बनावट युझरनेम तयार करून नागरिकांची फसवणूक करण्याचा धोका वाढू शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे. डिजिटल अरेस्ट, फिशिंग आणि ओळख चोरीसारख्या सायबर गुन्ह्यांनाही त्यामुळे खतपाणी मिळू शकते, असे सरकारचे मत आहे.

दरम्यान, मेटाने भारतात ‘व्हॉट्सॲप प्लस’ ही सशुल्क सेवा देखील सुरू केली आहे. दरमहा ७९ रुपये शुल्क भरून वापरकर्त्यांना विशेष थीम्स, ॲप आयकॉन्स, स्टिकर्स आणि रिंगटोन्स यांसारख्या अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहेत. मात्र, या योजनेत संदेशवहन, व्हॉइस कॉल किंवा गोपनीयतेशी संबंधित कोणतीही अतिरिक्त सुविधा समाविष्ट नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!