‘काय’ आहे विशाल पै काकोडे यांनी के. सी. वेणुगोपाल यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात?
मडगाव : राजकीय विश्लेषक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दीर्घकाळ निष्ठावान समर्थक विशाल पै काकोडे यांनी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या गोवा दौऱ्यापूर्वी त्यांना खुले पत्र पाठवून गोव्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. हे प्रश्न कटुतेतून नव्हे, तर पक्षाविषयीच्या निष्ठा आणि चिंतेतून उपस्थित करण्यात आल्याचे सांगत त्यांनी हे हजारो समर्पित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचे नमूद केले.
१९७९ मध्ये काँग्रेस पक्ष ‘गाय-वासरू’ या चिन्हावर निवडणूक लढवत असताना पक्षाशी आपला प्रवास सुरू झाल्याची आठवण करून देताना पै काकोडे यांनी गेली चार दशके पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहिल्याचे सांगितले. या काळात त्यांनी कधीही कोणतेही संघटनात्मक पद किंवा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली नाही. मडगाव मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचे ते तीन विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक एजंट होते. संबंधित उमेदवाराने नंतर पक्षांतर केले तरी आपण ना विचारसरणी बदलली, ना त्यांच्यासोबत राजकीय वाटचाल सुरू ठेवली, असे त्यांनी स्पष्ट केले.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आपण सक्रिय योगदान दिल्याचे सांगताना विशाल पै काकोडे यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्या गोवा दौऱ्यांमध्ये समन्वय साधणे, भाजप सरकारविरोधातील काँग्रेसचे आरोपपत्र तयार करणे, गोवा विधानसभा निवडणूक जाहीरनामा तयार करण्याच्या आणि त्याच्या संकल्पनेच्या प्रक्रियेत सहभाग घेणे, दोन कोकणी प्रचारगीते तयार करणे तसेच दोना पावल येथे राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘प्लेज ऑफ लॉयल्टी’ कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडल्याचा उल्लेख केला.
या खुल्या पत्रामध्ये पै काकोडे यांनी एआयसीसी नेतृत्वासमोर सात प्रश्न उपस्थित केले आहेत. गोव्यात दुसऱ्या फळीचे नेतृत्व तयार करण्यात आलेले अपयश, वारंवार अपयशी ठरलेल्या व्यक्तींनाच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्याची पद्धत, नोव्हेंबर २०२२ नंतर राजकीय व्यवहार समितीची फेररचना न होणे, वेळ्ळी आणि बाणावली मतदारसंघांबाबत पक्षाची भूमिका, गोवा काँग्रेसमध्ये आरएसएसच्या वैचारिक ‘स्लीपर सेल्स’च्या उपस्थितीबाबतची चिंता, जीपीसीसीच्या खजिनदारपदी बिल्डर-कम-व्यावसायिकाची नियुक्ती आणि पक्ष संघटना मजबूत करण्याऐवजी इतर पक्षांच्या यशाचे कौतुक करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि समर्पणामुळेच १४० हून अधिक वर्षे टिकून असल्याचे सांगत पै काकोडे यांनी के. सी. वेणुगोपाल यांच्या गोवा दौऱ्यामुळे प्रामाणिक आत्मपरीक्षण आणि अर्थपूर्ण संघटनात्मक सुधारणांना सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. गोव्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा आवाज ऐकून अंतर्गत लोकशाही, गुणवत्तेवर आधारित नेतृत्व, उत्तरदायित्व आणि निष्ठेचा सन्मान पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी एआयसीसी नेतृत्वाला केले.


