उसगावच्या सरपंच, सचिवा विरोधात तक्रार
म्हापसा :
काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषा उसगावकर यांनी उसगाव गांजे ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिव यांनी प्रक्रिया न करता बँकेतून १ लाख काढल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात पंचायत संचालकांकडे तक्रार केली आहे.
मनीषा उसगावकर यांनी आज पत्रकार परिषद घेवून या संदर्भातील माहिती दिली. पंच सदस्य मनिषा उसगावकार यांच्या नजरेस हा प्रकार आल्यानंतर त्यांनी सरपंच नरेंद्र उसगावकर आणि पंचायत सचिव प्रसाद शेट यांच्या विरोधात ही तक्रार केली आहे.
श्रीमती उसगावकर यांनी सांगितले की सरपंच नरेंद्र उसगावकर आणि पंचायत सचिव प्रसाद शेट यांनी उसगाव गांजे ग्रामपंचायतीच्या खात्यातून कुठलीच प्रक्रिया न करता 1 लाख रुपये काढले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उसगाव शाखेतील धनादेश क्रमांक 311409 मार्फत हे पैसे काढण्यात आले आहेत.
‘संपूर्ण पंचायत मंडळाला अंधारात ठेवून त्यांनी हा प्रकार केला आहे. मी चेकबुक रेकॉर्ड स्लिप पाहिली तेव्हा हा प्रकार माझ्या नजरेस आला,‘ असे त्या म्हणाल्या.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विजय भिके यांनी निदर्शनास आणून दिले की, 7 मार्च, ह्या दिवशी होळी असल्याने सार्वजनिक सुट्टी होती आणि ग्रामपंचायत बंद होती. त्यामुळे 1994 च्या गोवा पंचायत राज कायद्याचे उल्लंघन करून जनतेचा पैसा गुप्तपणे आणि मनमानी पद्धतीने काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘पंचायतीच्या ठरावाशिवाय अत्यंत आपत्कालीन परिस्थितीतही एवढी मोठी रक्कम काढण्याचा निर्णय सरपंच आणि सचिव घेऊ शकत नाहीत,‘ असे ते म्हणाले.
वीरेंद्र शिरोडकर, उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणाले की, हे बेकायदेशीर कृत्य म्हणजे सरपंच आणि त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांचा सचिवांनी केलेला उघड गैरवापर आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.