
कॉंग्रेसचे बुडणारे जहाज वाचवा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आर्त हाक
मडगाव :
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि विधीमंडळ गट नेते युरी आलेमाव यांनी त्यांची नेमणूक झाल्यापासून विविध मतदारसंघाचे दौरे करुन कार्यकर्त्यांची फारशी भेट घेतलेली नाही, नेत्यांशी सपर्क साधणे कार्यकर्त्यांना कठीण झाले आहे. खंबीर नेतृत्वाच्या अभावाने कॉंग्रेस पक्ष नेस्तनाबूत होईल असा इशारा देत कॉंग्रेसच्या विवीध गट समितींच्या सदस्यांनी कॉंग्रेसच्या गोवा संयुक्त प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे गोव्यात त्वरित नेतृत्वबदल करण्याची मागणी केली असल्याचे कळते.
गोव्यात आगामी जिल्हा पंचायत निवडणुका तसेच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत इतर राजकीय पक्षांशी युती नको अशी मागणी वेळ्ळी गट समितीने सोमवारी डॉ. अंजली निंबाळकरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली. साखळी मतदारसंघातील बैठकीत कार्यकर्त्यांनी उघडपणे स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन प्रदेशाध्यक्ष बदलण्याची जोरदार मागणी केल्याचे कळते. कुंकळ्ळीतही कॉंग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे मतदारसंघात येतच नसल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या पदाला न्याय देण्यास ते असमर्थ ठरल्याचे कार्यकर्त्यांनी डॉ. अंजली निंबाळकरांच्या निदर्शनास आणून दिले.

कॉंग्रेसच्या प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी असा तीन दिवसीय गोवा दौरा करुन, मुरगाव, दाबोळी, साखळी, पर्ये, वाळपई, वेळ्ळी व कुंकळ्ळी मतदारसंघाना भेट देवून गट समित्यांशी संवाध साधला व पक्षाच्या संघटना बांधणीचा आढावा घेतला. सांत आंद्रे व नावेली येथिल बैठका ऐनवेळी रद्द करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख हे एकमेव पदाधिकारी त्यांच्या दौऱ्यात सोबत हजर होते.
हायकंमाडने नेमलेल्या संयुक्त प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकोस्ता व कार्लुस फरैरा यांनी पाठ फिरवल्याचे समजते. दाबोळी मतदारसंघात खासदार कॅप्टन विरीयातो फर्नांडिस मात्र बैठकीला हजर राहिले असे कळते. स्थानिक नेतृत्वाने प्रभारींच्या दौऱ्यावर एक प्रकारे बहिष्कारच टाकल्याने डॉ. निंबाळकर प्रचंड नाराज झाल्याचे समजते. त्यातच तळागाळातील कार्यकर्त्यांनी स्थानिक नेतृत्वाच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने गोव्यातील कॉंग्रेसच्या भवितव्याबद्दल त्याही कोड्यात पडल्याचे कळते.
दरम्यान, सार्वजनीक लेखा समिती व सार्वजनीक उपक्रम समितीचे अध्यक्ष असुनही मागील दोन वर्षात एकही अहवाल तयार न केल्याबद्दल सदर समित्यांचे अध्यक्ष एल्टन डिकोस्ता व युरी आलेमाव यांच्या विरुद्ध अनेक कार्यकर्त्यांनी हायकंमाडकडे तक्रार दाखल केल्याने, डॉ. अंजली निंबाळकर यांनी अनेकांकडून सत्यता पडताळून पाहिल्याचे समजते. सदर अहवाल मुद्दाम जाणुनबुजून तयार न केल्याचे बहुतेक कार्यकर्त्यांचे मत होते असे कळते. त्यातच पीएसी व पीयुसीच्या कार्यकाळावर बातमी छापणाऱ्या वर्तमानपत्रांविरुद्ध तक्रार दाखल करुन संपादकांना सभापतींकडे येण्यास भाग पाडल्याच्या विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या कृतीवरही अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याचे कळते.
गोव्यात कॉंग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करायचे असेल तर पक्षश्रेष्ठीनी वेळ न घालवता पक्षाची सुत्रे अनुभवी व कार्यक्षम व्यक्तीकडे देणे गरजेचे असून, सर्वांना सोबत घेवून जाणारे तसेच कायम संपर्कात असणारे नेतृत्व गरजेचे असल्याचे मत बहुतेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. प्रदेशाध्यक्ष पाटकर व विधीमंडळ गटनेते युरी आलेमाव हे फोनच घेत नसल्याचे अनेकांनी डॉ. निंबाळकरांच्या निदर्शनास आणून दिले.