लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधीच्या नावावर शिक्कामोर्तब
लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते के.सी. वेणूगोपाल यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रो-टेम स्पीकर भर्तृहरी महताब यांना पत्र लिहित राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील, अशी माहिती दिल्याचे वेणूगोपाल म्हणाले.
महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झालेले गांधी घराण्यातील तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी हे पद भूषवलं आहे. दरम्यान, ९ जून रोजी झालेल्या काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड करावी, यासंदर्भातील ठराव पारीत करण्यात आला होता. मात्र, मला यासंदर्भात विचार करण्यासाठी वेळ द्या, असे राहुल गांधी म्हणाले होते.
दरम्यान, गोव्यातील विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राहुल गांधी यांच्या या निवडीचे स्वागत केले असून, ते ‘आयडिया ऑफ इंडिया’साठी यापुढेही अथक कष्ट करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
तर, गोवा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी राहुल गांधी यांचे अभिनंदन करताना ते संसदेमध्ये देशाचा आवाज होतील, असा विश्वास व्यक्त केला.