google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवासिनेनामा 

इफ्फीवरून काँग्रेसने भाजपला धरले धारेवर…

पणजी :

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भारतीय जनता पक्षासाठी ‘मनी मेकिंग मशीन’ बनला आहे. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या सरकारी आकडेवारीवरुन इफ्फीचे आंतरराष्ट्रीय महोत्सवावरुन आता देशी महोत्सवात पतन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. माझी आकेडवारी  चुकीची असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुराव्यानीशी सिद्ध करावे असे थेट आव्हान  काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी दिले आहे.


कॉंग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेश कोचरेकर आणि समाज माध्यम संयोजीका शमिला सिद्दिकी यांच्यासह काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेला संबोधित करताना अमरनाथ पणजीकर यांनी गोवा सरकार इफ्फी-२०२४ साठी सुमारे २८ कोटी रुपये खर्च करणार असल्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, भाजप सरकार गोमंतकीयांना कोणताही फायदा नसलेल्या सदर महोत्सवावर एवढा मोठा वायफळ खर्च करत आहे.


गोवा मनोरंजन संस्था दरवर्षी १००००  प्रतिनिधींची इफ्फीला नोंदणी झाल्याचा  खोटा प्रचार करते. या वर्षी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, दरवर्षी ८००० प्रतिनिधी इफ्फीसाठी नोंदणी करतात. इफ्फीच्या  मागील चार आवृत्त्यांमध्ये प्रतिनिधी नोंदणी ७७०० च्या वर गेली नाही हे सरकारी आकेडवारीच सांगते, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.


इफ्फीला जरी  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हटले जात असले तरी, गेल्या वर्षी इफ्फी-२०२३ साठी केवळ १६२ परदेशी प्रतिनिधी या महोत्सवात उपस्थित होते.  यावरून इफ्फीची शान व महत्व हरपल्याचे दिसून येते, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

इफ्फी-२०२३ साठी केंद्र सरकारने केवळ ७६ लाखांचे योगदान दिले. २०२३ मध्ये खाजगी प्रायोजकांकडून फक्त ५ लाखांचे प्रायोजकत्व सरकारला मिळाले होते. इफ्फी ब्रँड म्हणून अपयशी ठरला आहे आणि गोवा सरकारची भूमिका फक्त ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी एजंटची झाली आहे, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

२०२० ते २०२३ या कालावधीत झालेल्या चार आवृत्त्यांमध्ये इफ्फीच्या अधिकृत विभागात फक्त एक गोमंतकीय चित्रपट “वाग्रो” प्रदर्शित करण्यात आल्याचे सरकारी माहितीवरून दिसून येते. इफ्फीमध्ये चित्रपट दाखवले जातील असे खोटे आश्वासन भाजप सरकार गोव्यातील चित्रपट निर्मात्यांना देत आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

आज इफ्फी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी चरण्याचे कुरण झाले आहे. आज अव्वाच्या सव्वा दराने निवीदा काढल्या जातात. एवढा खर्च करुनही एकंदर आयोजन व व्यवस्था ढिसाळ होत असल्याने प्रतिनिधी आता या महोत्सवाकडे पाठ फिरवीत आहेत, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

कॉंग्रेस सरकारने सुरू केलेली चित्रपट अनुदान योजना भाजप सरकारने बासनात गुंडाळून ठेवली आहे. कॉंग्रेस सरकारच्या काळात अनेक गोमंतकीय चित्रपट इफ्फीच्या अधिकृत विभागात प्रदर्शित झाले होते, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!