IFFI 53 : संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप लवकर तयार करण्याचे निर्देश…
पणजी:
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) तयारीचा आढावा घेतला.महोत्सवातील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या ठिकानांना मुरुगन यांनी आज भेट देऊन पाहणी केली आणि ही कार्यक्रम स्थळे लवकरात लवकर कार्यान्वित करावी ,असे सांगितले . माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक (पश्चिम विभाग) मोनीदीपा मुखर्जी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी ) व्यवस्थापकीय संचालक रवींद्र भाकर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव (चित्रपट) प्रिथुल कुमार, गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई, गोवा सरकारचे माहिती आणि जनसंपर्क सचिव सुभाष चंद्रा, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेतिका सचन आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
फिल्म बाजार आणि राज्यांची दालने यांसारख्या इफ्फीमध्ये होणार्या विविध कार्यक्रमांसाठी तयार करण्यात आलेल्या कार्यक्रम स्थळांचा केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दौरा केला. ही कार्यक्रम स्थळे अद्याप तयारीच्या विविध टप्प्यात असल्याने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले.कार्यक्रम स्थळांच्या भेटीनंतर मंत्री मुरुगन यांनी 53 व्या इफ्फीच्या आयोजन आणि व्यवस्थापनामध्ये सहभागी असलेल्या विविध संस्थांसोबत बैठक घेतली. हा महोत्सव शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने, सर्व संबंधितांना सर्वतोपरी प्रयत्न करून एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी या बैठकीत केले. इफ्फीला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी , निसर्गदत्त गोव्याचा आनंद आणि या महोत्सवाचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
53 व्या इफ्फीमध्ये प्रतिनिधी आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना आनंददायी अनुभव मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाईल यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी या बैठकीत भर दिला. प्रतिनिधींना या महोत्सवाचा उत्तम अनुभव कसा घेता येईल याचे नियोजन करता येण्याच्या अनुषंगाने , संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप दोन्ही लवकरच तयार करावेत,असे निर्देश त्यांनी दिले.
यंदाच्या इफ्फीमध्ये सादर करण्यात येणाऱ्या विविध नवीन वैशिष्ट्यांची माहिती, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र भाकर यांनी उपस्थितांना दिली. अन्य कोणत्याही मागील पर्वाच्या तुलनेत इफ्फीच्या या पर्वामध्ये ,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही स्तरावरच्या चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची संख्या जास्त असेल अशी माहिती व्यवस्थापकीय संचालकांनी दिली. वेळापत्रक आणि नियोजन व्यवस्थित झालेले आहे आणि प्रतिनिधींना तपशीलवार वेळापत्रक लवकरच उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी चित्रपट क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि प्रतिनिधी या दोघांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विविध सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.आनंद आणि उत्सवाचे नेहमीचे वातावरण राखताना सुरक्षिततेच्या गरजा संतुलित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.