‘आगींच्या घटनांबाबत रिस्क घेणार नाही’
Vishwajit Rane: गोव्यात गेल्या काही दिवसांत जंगलात लागलेल्या आगींच्या घटनांबाबत अजिबात रिस्क घेणार नाही, असे सांगत राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. या आगींवर नियंत्रणासाठी आणि आग लागू नये यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, या आगीच्या घटनांमध्ये वन्यजीव, वनस्पतींचे नुकसान झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वनमंत्री राणे म्हणाले की, काणकोन ते सत्तरी या भागातील आगीच्या घटनांची मी नुकतीच हवाई पाहणी केली आहे. आग विझविण्यासाठी अतिरिक्त पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यात स्थानिकांनाही सहभागी करून घेतले आहे. याशिवाय केंद्र सरकारही मदत करत आहे.
नौदलाचे आणखी एक हेलिकॉप्टर कर्नाटकातून येणार आहे. फक्त डोंगराच्या माथ्यावर आग कशी लागते हे समजत नाही. आग खाली लागते आणि वर जाते. त्यामुळे याबाबत सविस्तर चौकशी केली जाणार आहे.
राणे म्हणाले, गेल्या काही दिवसांत आगीच्या घटना घडल्या आहेत. वन खात्याचे या घटनांकडे लक्ष आहे. आगीच्या सर्व घटनांमध्ये लक्ष घातले आहे. 700 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. काल रात्रीच मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बैठकही झाली.