
माझ्यामुळेच ऑफलाइन रेशनकार्ड अर्ज स्वीकारण्यावर सरकारची मंजुरी : एल्टन
मडगाव :
सरकारी अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, भाजप सरकारने अखेर शिधापत्रिकांशी संबंधित ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी मेमोरेंडम जारी केला. नागरी पुरवठा विभागाचे ऑनलाइन पोर्टल कोलमडल्यामुळे अडचणींचा सामना करणाऱ्या सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे असे केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी म्हटले आहे.
लोकांना शिधापत्रिका लाभार्थ्यांचे हस्तांतरण, तसेच निलंबित शिधापत्रिका संबंधी अर्ज सादर करताना सरकारच्या कोलमडलेल्या इंटरनेट नेटवर्क व नागरी पुरवठा खात्याची बंद असलेली पोर्टल यामुळे प्रचंड अडचणी आल्या, असे एल्टन डिकोस्ता म्हणाले.
तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गोव्याला इंट्रानेट ब्रॉडबँड ऑप्टिक फायबर नेटवर्क भेट दिले होते. हे इंटरनेट सेवेचे जाळे गोव्यातील प्रत्येक पंचायतीपर्यंत पोहोचले होते. दुर्दैवाने, भाजप सरकार हे नेटवर्कची देखभाल करण्यास अपयशी ठरले असून त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे, असा दावा एल्टन डिकोस्ता यांनी केला.
मला आशा आहे की नागरी पुरवठा निरीक्षक नागरी पुरवठा संचालक जयंत तारी यांच्या मेमोरेंडमची दखल घेवून जाईल ताबडतोब लोकांकडून थेट अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करतील आणि लोकांना सेवा देतील, असे एल्टन डिकोस्ता म्हणाले.
सरकारने लोकांप्रती संवेदनशील राहून जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर तत्परतेने काम केले पाहिजे. माझ्या वैयक्तिक पाठपुराव्यानंतरही बऱ्याच दिवसांनी सरकारला जाग आली हे खरोखरच खेदजनक आहे. मेमोरँडम जारी केल्याबद्दल मी नागरी पुरवठा संचालकांचे आभार मानतो, असे एल्टन डिकोस्ता यांनी सांगितले.