राजधानीत विकलांग व्यक्तींसाठी होणार मोफत तपासणी
पणजी :
विकलांग व्यक्तींसाचे गोवा राज्य आयुक्त कार्यालय, गोवा समाजकल्याण संचालनालय यांच्या पुढाकाराने आणि कृत्रिम अवयव उत्पादन मंडळ (आर्टिफिशियल लिम्ब्ज मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन – आलिमको) यांच्या सहकार्याने पर्पल फेस्ट उपक्रमाचा एक भाग म्हणून विकलांग व्यक्तींसाठी उपयुक्त साधने व उपकरणे यांची खरेदी करणे, दुरुस्ती करणे यासाठी एड्स अँड अप्लायन्सेस कॅम्प (एडीआयपी)चे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व नोंदणीकृत विकलांग व्यक्तींसाठी ६ ते ८ जानेवारी दरम्यान सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत आयनॉक्स पार्किंग एरिया, गोवा मनोरंजन संस्था संकुल-पणजी येथे आयोजित शिबिर मोफत असणार आहे, अशी माहिती विकलांग व्यक्तींसाठीचे गोवा राज्य आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिली.
या राष्ट्रीय स्तरावरील शिबिरात विकलांग व्यक्तींच्या क्षमतेची तपासणी करण्यात येणार असून त्यानुरूप आवश्यक साहित्य, साधने-उपकरणे मोफत उपलब्ध कऱण्यात येणार आहेत. विकलांगतेमुळे येणाऱ्या अडचणींवर मात करत अशा व्यक्तींचे शारिरीक, सामाजिक आणि मानसिक पुनर्वसन करणे आणि त्यांना आर्थिक उत्पन्नाच्या संधी घेण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत आलिमकोचे वित्त अधिकारी विपिन सिंह रावत म्हणाले, “शिबिरामध्ये आमचे डॉक्टर आणि अनुभवी पथक उपलब्ध असेल. पात्रतेसाठीची कागदपत्रांची तपासणी करून शिबिरात आलेल्यांची नोंदणी केली जाईल. त्यानंतर नोंदणीकृत शिबिरार्थींची क्षमता तपासणी करून कोणत्या साधन-उपकरणाची गरज शोध घेऊन त्याची नोंद केली जाईल.”
या क्षमता तपासणी शिबिरानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत पात्र नोंदणीकृत लाभार्थ्यांना साधन-उपकरणांचे वितरण करण्यासाठी खास शिबिर घेण्यात येणार आहे.
या शिबिरात नावनोंदणीसाठीची पात्रता खालीलप्रमाणे आहे:
1) अधीकृत वैद्यकीय महामंडळ किंवा युडीआयडीद्वारे अदा केलेले ४०% वा त्याहून अधिकची शारीरिक विकलांगतेचे प्रमाणपत्र
2) उत्पन्नाचा पुरावा: सक्षम कार्यालयाद्वारे प्राप्त २लाख ७० हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाचा दाखला
3) आधार कार्ड
शिबिरामध्ये येताना वरील कागदपत्रांची खरी प्रत तसेच सत्यप्रत आणि पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो घेऊन यावयाचे आहे.
विकलांग व्यक्तींना स्वतंत्रपणे व स्वतः काम करता यावे, इतरांवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि दुय्यम विकलांगतेची शक्यता कमी करावी या उद्देशाने एडीआयपी योजना १९८१ साली सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये उपयुक्त साधन-उपकरणाचे वितरण करण्याआधी गरजेप्रमाणे आवश्यक शस्त्रक्रिया करण्याचीही तरतूद आहे. यासाठी योजना अंमलबजावणी करणाऱ्या विविध संस्थांना मदतीसाठी तसेच आवश्यक साधन-उपकरणांची खरेदी व वितरण करण्यासाठी शासनाकडून आर्थिक साह्य दिले जाते.
केंद्रीय समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत विकलांग व्यक्तींसाठीचा सक्षमीकरण विभाग अंतर्गत काम करणारी आलिम्को ही केंद्रीय शासकीय संस्था आहे. १९७२ साली स्थापना झाल्यापासून आलिम्कोने विकलांग व्यक्तींच्या मदतीसाठी विविध साधन-उपकरणांची निर्मिती केली आहे. आजवर देशभरातील ४२ लाख विकलांग व्यक्तींना विविध उपकरणांचे वितरण या संस्थेद्वारे करण्यात आले आहे. आलिम्कोद्वारे दृष्टी, श्रवण तसेच बौद्धिक क्षमता समस्यांबाबत ३५ प्रकारची ३६० श्रेणींमध्ये किफायतशीर व दर्जेदार साधने-उपकरणे बनवली जातात.