Goa : ‘बीच, कॅसिनो, धागडधिंगा म्हणजे गोवा नव्हे’
Goa : बीच, कॅसिनो, धागडधिंगा म्हणजे गोवा (Goa) नव्हे. गोव्याची खरी श्रीमंत ही सांस्कृतिक परंपरेत आहे आणि याच सांस्कृतिक परंपरेद्वारे देश विदेशी पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. गोव्याची ही परंपरा सर्वांनी जपली पाहिजे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
मडगावात रवींद्र भवनात मुंबईच्या सारस्वत प्रकाशन व गोवा सारस्वत समाज यांच्या संयुक्त विद्यमाने 23 व्या सारस्वत चैतन्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पर्यटन मंत्री खंवटे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी आमदार विजय सरदेसाई उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत म्हणाले, सारस्वतांसाठी गौरव सोहळा आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तो मठग्राममध्ये संपन्न होत असल्याने आम्हांला अधिकच आनंद होत आहे.
इतर समाजांना बरोबर घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी सारस्वत समाजावर आहे. सारस्वत समाजातील गरजूंना समाजाने मदतीचा हात द्यावा.
सोहळ्यात वकील प्रकाश श्रीरंग प्रभुदेसाई, शाणू आत्माराम पै पाणंदीकर, शेखर रवींद्र सरदेसाई, केशव (राजू) मेघश्याम नायक, रामनाथ पै रायकर, नितीन कुंकळ्ळीकर, डॉ. प्रदीप बोरकर, सारस्वत विद्यालय सोसायटी, पुर्ती अमेय लोटलीकर यांचा सन्मान करण्यात आला.
सारस्वत प्रकाशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी आभार व्यक्त केले. प्रसाद कुलकर्णी व डॉ. स्मिता संझगिरी यांनी सूत्रसंचालन केले.
या सोहळ्यात आयोजक कार्याध्यक्ष नवनाथ खांडेपारकर, गोवा (Goa) सारस्वत समाजाचे शिरीष पै, सारस्वत प्रकाशनचे संपादक सुधाकर लोटलीकर, कार्यवाह राहुल साखळकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.