google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

राज्य सरकारविरोधात काँग्रेसचे ‘मौन सत्याग्रह’

पणजी:

मोदी आडनाव बदनामी प्रकरणी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी व समर्थकांनी बुधवारी आझाद मैदान-पणजी येथे दिवसभराचा ‘मौन सत्याग्रह’ केला.

भाजपने जनतेचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरु केल्याने कॉंग्रेस नेत्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या आणि एका प्रकारे निषेध केला.

पत्रकारांशी बोलताना गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ देशभरात ‘मौन सत्याग्रह’ करण्यात येत आहे.

भाजप सरकारने देशातील लोकशाहीची हत्या केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कृत्यांचा राहुल गांधी यांनी पर्दाफाश केल्यानेच त्यांना संसदेतून अपात्र केल्याचे स्पष्ट झाले आहे,” असे पाटकर म्हणाले.

ते म्हणाले की, मोदी सरकार देशातील लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या या जाचक वृत्तीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते मूक सत्याग्रह करत आहेत.

“राहुल गांधी सामान्य माणसाच्या हितासाठी काम करत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या भारत जोडो यात्रेत लोकांनी त्यांचे स्वागत केले. भाजपला त्यांच्या लोकप्रियतेची भीती वाटत होती आणि जेव्हा त्यांनी मोदी आणि अदानी यांच्यातील संबंध उघड केले तेव्हा त्यांची संसदेतून अपात्र करण्यात आले ,” असे ते म्हणाले.

पाटकर म्हणाले की, भाजपच्या राजवटीत काहीही चांगले घडत नाही. “गोव्यात काँग्रेसच्या आमदारांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाजपने आमच्या आमदारांना वस्तूंप्रमाणे खरेदी केले आणि ईडी तसेच सीबीआयसारख्या केंद्रीय एजन्सीचा वापर करून त्यांच्यावर दबाव आणला. सत्तेत राहण्यासाठी आणि सत्ता बळकावण्याची भाजप ही पद्धत वापरत आहे,” असे पाटकर म्हणाले.

हळदोणचे आमदार ॲड कार्लूस फॅरेरा म्हणाले की, राहुल गांधींवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे.

“राहुल गांधी हे गरीबांचे खरे नेते आहेत आणि आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांची खऱ्या अर्थाने काळजी घेणारे नेते आहेत. आपल्या संविधानात नमूद केलेली खरी लोकशाही मूल्ये पुनर्संचयित करण्यासाठी आपण एकत्रितपणे लढा देऊ,” असे ते म्हणाले.

फॅरेरा म्हणाले की, भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून जनतेचा आवाज दाबत आहे.

ज्येष्ठ उपाध्यक्ष एम के शेख, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, ज्येष्ठ नेते शंभू बांदेकर, महिला अध्यक्षा बीना नाईक, अमरनाथ पणजीकर, सुभाष फळदेसाई, तुलिओ डिसूझा, एव्हर्सन वालेस, ऑर्विल दोरादो, विरिएटो फर्नांडिस, वीरेंद्र शिरोडकर, सावियो डीसिल्वा, मोरेन रिबेलो,वरद म्हार्दोळकर, विजय भिके, नौशाद चौधरी, विवेक डिसिल्वा, जयदेव प्रभुगावकर, नियाजी शेख आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!