‘पोलीस विभागाचे भगवेकरण सुरू’
पणजी :
एकीकडे भाजप सरकार आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन करत असताना दुसरीकडे गोव्यात पोलिस विभागाचे भगवेकरण सुरू झाले आहे. हणजुणे पोलीस ठाण्यात भाजपचे बॅनर लावून हणजुणे भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा व इतरांनी सत्तेचा केलेला उघड गैरवापर हा त्याचा थेट पुरावा आहे असा गंभीर आरोप युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी केला आहे.
गृह खात्याचा ताबा असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या या गैरकृत्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे आणि राजकीय फायदा घेण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याबद्दल गोव्यातील जनतेची माफी मागावी.
हणजुणे पोलीस निरीक्षकाने केलेल्या नियमांच्या घोर उल्लंघनाची पोलीस महासंचालकांनी गांभीर्याने दखल घ्यावी व भाजपचा राजकीय प्रचार करण्यात त्यांचा थेट सहभाग असल्याबद्दल त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी केली आहे.
वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी देखील हणजुणे येथील विद्युत विभाग कार्यालयात भाजपचे बॅनर लावण्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
हणजुणे भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा पूजा चोडणकर, जि.प. सदस्या निहारिका मांद्रेकर आणि सानिशा तोरस्कर यांच्यासह इतरांनी पोलीस स्टेशन आणि विद्युत विभाग कार्यालयात भाजपचे बॅनर लावणे हा गंभीर व धक्कादायक प्रकार आहे असे मत ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी व्यक्त केले.
राजकीय लाभ घेण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाहीत. भाजपची संस्कृती ही दडपशाही व झुंडशाहीची असुन सत्तेच्या बळावर भाजपकडुन सरकारी यंत्रणेचा सर्रास गैरवापर केला जात आहे.
केवळ भाजप परिवाराच्या सदस्यांचेच नव्हे तर राज्यातील संपूर्ण नागरिकांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, हे पोलीस अधिकाऱ्यांनी जाणून घेतले पाहिजे, असे अॅड. वरद म्हार्दोळकर म्हणाले.
भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पक्षाच्या राजकीय कार्यक्रमासाठी शासकीय जागेचा गैरवापर करणाऱ्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी व अन्य भाजप कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ॲड वरद म्हार्दोळकर यांनी केली आहे.