सांगोल्डा येथील कोमुनिदादच्या जागेतील 22 बेकायदेशीर घरांवर प्रशासकांनी हातोडा फिरवला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या आठवड्यात शुक्रवार आणि शनिवारी अशी दोन दिवस ही कारवाई करण्यात आली.
बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या घरातील बहुतांश लोक कन्नड असल्याचे समोर आल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याप्रकरणी चिंता व्यक्त केली. दरम्यान, आता सिद्धरामय्या यांच्यावर गोवा भाजपने सडकून टीका करत, त्यांना कर्नाटकातील समस्यांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिलाय.
“सांगोल्डा येथे राहत असलेल्या कन्नड नागरिकांची घर हटविण्याचे काम सुरु आहे त्याबाबत चिंता वाटत आहे. विस्थापित नागरिकांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत ही कारवाई ताबोडतोब थांबवावी,” अशी विनंती मी मुख्यमंत्री सावंत यांना करतो.
कारवाईचा फटका बसलेल्या सर्वांना स्थैर्य आणि सन्मान मिळवून देणे आपली जबाबदारी असल्याचे, सिद्धरामय्या यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
सिद्धरामय्या कर्नाटकातील लोकांची काळजी घेण्यास अपयशी ठरले आहेत, त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या राज्यातील समस्यांकडे लक्ष द्यावे. बेंगळुरुत भीषण पाणी समस्या निर्माण झालीय, त्यात त्यांनी लक्ष घालावे, अशी टीका वेर्णेकरांनी केली.
तर, बेकायदेशीर घरावरील कारवाई बाबत बोलताना त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केल्याचे म्हटले. तसेच, याबाबत अहवाल सादर करण्याची मुदत होती, असे त्यांनी नमूद केले. बेकायदेशीर घरांबाबत कोमुनिदाद प्रशासनच न्यायालयात गेल्याचे त्यांनी सांगितले.
विस्थापितांना शक्य सर्व मदत केली जाईल असे आश्वासन यापूर्वीच गोवा सरकारने दिल्याचेही वेर्णेकरांनी म्हटले आहे.