‘सरकार, इव्हेंट कंपनीकडून २४ तासांत चमत्कार होण्याची अपेक्षा करते आहे का?’
पणजी :
क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दावा केल्यानुसार कोटेशनशिवाय बांधलेला ताजमहाल पूर्ण होण्यासाठी २२ वर्षे लागली. आता इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीने वर्क ऑर्डर जारी केल्यापासून २४ तासांपेक्षा कमी कालावधीत फिफा अंडर -१७ महिला विश्वचषक स्पर्धेसाठी अंदाजे रु.३.४८ कोटीच्या कार्यक्रम व्यवस्थापनाचा चमत्कार करु शकणारा प्रस्ताव सादर करण्याची अपेक्षा गोवा क्रिडा प्राधिकरणाने ठेवल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
गोव्याच्या क्रीडा प्राधिकरणाने ९ सप्टेंबर रोजी स्थानिक दैनिकांमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीजकडून प्रस्ताव निमंत्रित केलेल्या जाहिरातीचा संदर्भ देत अमरनाथ पणजीकर यांनी भाजप सरकारवर सार्वजनिक पैशाचा गैरवापर करून आणखी एक घोटाळा करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप केला आहे.
गोवा क्रिडा प्राधिकरणाने फिफा सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या कार्यक्रम आयोजनासाठी इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सींकडून मागविलेल्या प्रस्तावासाठी सदर कामाच्या एकंदरीत कार्यक्षेत्राचा तसेच इतर तांत्रीक बाबींचा उल्लेखच नसल्याचे सांगुन, सरकारची निवीदा म्हणजे भाजपच्या “मिशन कमिशन” चे धोरण पूढे नेण्याचाच भाग आहे. एजन्सींना भ्रष्टाचार करण्यास वाव देण्यासाठीच सर्व काही खुले ठेवण्यात आले आहे असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
गोवा क्रिडा प्राधिकरणाने जारी केलेल्या जाहिरातीत कोणत्याही घटकाचा तपशील नसताना सदर कामासाठी ३.४८ कोटींचा अंदाजे खर्च कोणत्या आधारावर काढला गेला असा सवाल अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
प्रस्ताव मागण्याच्या सूचनेसोबत जोडलेल्या परिशिष्टांमध्ये गोव्याच्या क्रीडा प्राधिकरणाने जारी केलेले “फॅक्ट शीट” सूचित करते की सदर कामाची आर्थिक बोली १९ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता उघडल्या जातील. योगायोगाने, क्रिडा प्राधिकरणानेच जारी केलेल्या “टाइमलाइन” मध्ये असे म्हटले आहे की सदर कार्यक्रमाचे आयोजन २१ सप्टेंबर २०२२रोजी होणार आहे. या तारखांकडे बारकाईने लक्ष दिल्यास इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीला वर्क ऑर्डर मिळाल्यापासून २४ तासांपेक्षा कमी वेळेत आवश्यक व्यवस्था तयार करण्यासाठी “सुपर पॉवर्स” गुंतवावे लागतील असे अमरनाथ पणजीकर यांनी नमुद केले आहे. इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीसोबत “सेटींग” चे हे स्पष्ट आहे असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
सदर निविदा दस्तऐवजात कामाच्या व्याप्तीच्या उल्लेखात थीम आधारित गाण्याची निर्मीती, आमंत्रणे, माहितीपत्रके छापणे, प्रतिनिधींसाठी वाहतुकीची व्यवस्था करणे, वातावरण निर्मीतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे इत्यादी कामांचा उल्लेख आहे. परंतु प्रतिनिधींची संख्या, कार्यक्रम स्थळ, निमंत्रण पत्रीकांची संख्ा इत्यादी तपशील देण्यात आलेला नाही. २४ तासांपेक्षा कमी वेळेत बसेस आणि वाहनांची व्यवस्था करणे, गाण्याची निर्मीती करणे या अशक्यप्राय गोष्टी असल्याचे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरीत निर्देश देऊन सदर निविदा प्रक्रिया थांबवावी, अशी माझी मागणी आहे. सर्व तांत्रिक तपशीलांसह नवीन निविदा जारी करून निविदा प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी गोवा क्रीडा प्राधिकरणाला मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत अशी मागणी काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.