‘आमचे सरकार भक्कम, आमदार आजही एकजूट’
पणजी :
गोव्यात भाजपचे भक्कम सरकार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्याकडे कोणत्याही आमदाराने संपर्क केलेला नाही. असे काही असल्यास सर्वांत अगोदर मला समजेल, अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी गोव्यातील उलटसुलट राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
जर हा प्रश्न थेट केंद्रीय नेत्याकडे गेला असल्यास देखील स्थानिक पातळीवर चर्चा झाल्याशिवाय निर्णय होत नसतो. अजून तरी किंवा आतापर्यंत कोणतीच माहिती याविषयी मिळालेली नाही, असंही भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केलं आहे. सदानंद शेट तानावडेंनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय वादावरही थेट निशाणा साधला आहे.
दरम्यान माजी मंत्री मायकल लोबो यांनी बेकायदा गोष्टी केल्या असतील, तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी लोबो-राणे वादामध्ये उडी टाकली आहे. विश्वजीत राणे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मायकल लोबोंविरोधात कारवाईची भाषा करत त्यांची दोन रिसॉर्ट पाडणार असल्याचंही सांगितलं होतं. यानंतर काँग्रेस नेत्यांनी राणेंवर निशाणा साधला होता. आता भाजप प्रदेशाध्यक्ष यांनीही या वादात उडी टाकल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.