‘गोवा माईल्सची सेवा सुरूच राहणार’
पणजी:
‘गोवा माईल्स’ ही ॲपआधारित टॅक्सी सेवा राज्यभरात सुरूच राहणार आहे. स्थानिक टॅक्सीमालकांना प्राधान्य देणारी ही जगातील एकमेव सेवा आहे. यात गोव्यातील पर्यटक टॅक्सी परवाने असलेल्या टॅक्सीमालकांना विनाशुल्क सहभागी होता येते, अशी माहिती गोवा माईल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्कर्ष दाभाडे यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात 2018 मध्ये गोवा माईल्स सेवा सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या चार वर्षांत ही सेवा राज्यात कायम आहे. सेवेचा लाभ घेणारे ग्राहक अजूनही आमच्याशी जोडलेले आहेत. राज्यातील नागरिकांना आणि येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने ही सेवा सुरू करण्यात आली होती, असे दाभाडे यांनी सांगितले.
दाबोळी विमानतळावर गोवा माईल्सचा काउंटर सुरू करण्यात आला होता, परंतु स्थानिक टॅक्सीचालकांनी विरोध केल्यानंतर तो बंद करण्यात आला. आता सरकारने तो पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. खुद्द वाहतूकमंत्र्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे भविष्यात विरोध झाल्यास संरक्षण देण्याची जबाबदारी ही पूर्णतः राज्य सरकारची आहे, असे ते म्हणाले.
2018 मध्ये सुरू झाल्यापासून गोवा माईल्सने सुमारे 14 लाख ग्राहकांनी हा ॲप डाऊनलोड करून त्यांचा फोन क्रमांक नोंद केला आहे. त्यामुळे भविष्यात कधीही त्यांना गोव्यात टॅक्सी सेवेची गरज पडल्यास ते थेट ॲप उघडून बुकिंग करू शकतात. एकदा सेवा घेतल्यानंतर क्रमांक नोंद केला जातो, जेणेकरून पुढच्या वेळी सेवा देणे सोपे होते.