५ ते १८ मार्च दरम्यान राज्यभर शिगमो महोत्सव
पणजी : गोवा राज्य शिगमो २०२६ साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहे. हा गोव्याच्या लोकसंस्कृतीतील एक महत्त्वाचा आणि रंगतदार सण असून संगीत, नृत्य आणि कलात्मक सादरीकरणांच्या माध्यमातून गोव्याची समृद्ध परंपरा सादर करतो. राज्यातील विविध केंद्रांवर होणाऱ्या शिगमो चित्ररथ मिरवणुकांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी पर्यटन मंत्री रोहन ए. खंवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस पर्यटन संचालक केदार नाईक आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक कुलदीप अरोलकर उपस्थित होते.
बैठकीत शिगमो उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन, वाहतूक व इतर व्यवस्था, वेळापत्रकांचे पालन आणि उत्सवाची प्रसिद्धी वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पर्यटन संचालक केदार नाईक, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप अरोलकर आणि जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक (मार्केटिंग/हॉटेल्स) श्री दीपक नार्वेकर यांनी शिगमो २०२६च्या तारखा, केंद्रे आणि इतर महत्त्वाची माहिती जाहीर केली.
माध्यमांशी बोलताना केदार नाईक यांनी सांगितले की, शिगमो महोत्सव ५ मार्च २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार असून राज्यातील १९ केंद्रांवर रंगतदार चित्ररथ मिरवणुका आयोजित करण्यात येणार आहेत. उत्सवाची सुरुवात ५ मार्च रोजी फोंडा येथे होईल. त्यानंतर ६ मार्चला कळंगुट, ७ मार्चला पणजी, ८ मार्चला म्हापसा, ९ मार्चला मांद्रे, १० मार्चला डिचेली, ११ मार्चला साखळी, १२ मार्चला शिरोडा व सांगे, १३ मार्चला धारबांदोडा व कुंकळी, १४ मार्चला मडगाव, १५ मार्चला पर्वरी व वास्को, १६ मार्चला वाळपई व कुडचडे, १७ मार्चला केपे व काणकोण आणि १८ मार्च २०२६ रोजी पेडणे येथे उत्सवाची सांगता होईल.
श्री नाईक यांनी पुढे सांगितले की, शिगमो उत्सवासाठी प्रत्येक समितीला दरवर्षी दोन प्रकारची अनुदाने दिली जातात – पायाभूत सुविधा सहाय्य आणि बक्षीस रक्कम. यावर्षी पायाभूत सुविधा सहाय्यात अतिरिक्त ₹१ लाखांची वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे उत्सव केंद्रांवरील व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे.
तसेच, मिरवणुकीचे मार्ग संबंधित शिगमोत्सव समित्यांनी वाहतूक विभागाशी सल्लामसलत करून आणि आवश्यक परवानग्या घेऊन निश्चित करावेत, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही, असेही सांगण्यात आले. सर्व समित्यांना नियम व अटींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रोमटामेळ गटांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली असून प्रत्येक गटात जास्तीत जास्त १५० सहभागी असावेत. शिगमो मिरवणुका दुपारी ४ वाजता सुरू होऊन शासनाने ठरवलेल्या वेळेत पूर्ण कराव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीला विविध नगरपरिषदांचे प्रतिनिधी, पोलीस विभाग, वाहतूक विभाग, अग्निशामन व आपत्कालीन सेवा, पर्यटन विभागाचे सहाय्यक संचालक श्री जयेश काणकोणकर तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यामुळे शिगमो २०२६ च्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयात्मक नियोजन झाल्याचे दिसून आले.
शिगमो महोत्सव २०२६ पुन्हा एकदा राज्यभरातील लोक आणि पर्यटकांना एकत्र आणून, रंगतदार चित्ररथ, लोकनृत्ये आणि उत्सवाच्या वातावरणातून गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

