
लिस्बन :
गोवा सरकारच्या कला व सांस्कृतिक विभागाने बीटीएल लिस्बन 2025 (Bolsa de Turismo de Lisboa) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनामध्ये आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी सादरीकरण करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला पहिला भव्य सहभाग नोंदवला.
गोवा कला व संस्कृती पॅव्हिलियनचे औपचारिक उद्घाटन गोवा राज्याचे माननीय कला व सांस्कृती तसेच क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी भारताचे पोर्तुगालमधील राजदूत पुनीत रॉय कुंडल, मयेचे आमदार प्रेमेंद्र वि. शेट, कुर्टालिमचे आमदार अँटोनियो वाझ, कला व सांस्कृती विभागाचे सचिव सुनील अंचीपाका (आयएएस) व कला व सांस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेलिप उपस्थित होते.
गोवा पॅव्हिलियनने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले, जिथे गोव्यातील कला, साहित्य, मातीची भांडी, फेणी आणि खास गोमंतकीय खाद्यपदार्थ जसे की बिबिंका व काजू यांचे सादरीकरण करण्यात आले. पंतप्रधानांच्या ‘विश्वकर्मा योजने’ अंतर्गत पारंपरिक गोमंतकीय कुम्हार उमाकांत पोके आणि संतोष गोवेकर यांनी मातीच्या वस्तू तयार करण्याचे थेट प्रात्यक्षिक दाखवले, जे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले.
संगीतकार कार्लोस गॉन्साल्विस व सिग्मंड डिसोझा यांनी घुमट आणि गिटारच्या सुरेल संगीत सादरीकरणाने पॅव्हिलियनमध्ये सांस्कृतिक उत्साह निर्माण केला.
माननीय कला, सांस्कृती व क्रीडा मंत्री गोविंद गावडे म्हणाले, “गोव्यातील सांस्कृतिक वारसा जगभरात प्रशंसित आहे. बीटीएल लिस्बन 2025 या आंतरराष्ट्रीय मंचावर आमचे संगीत, खाद्यसंस्कृती, हस्तकला व इतर सांस्कृतिक परंपरा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.”
कला व सांस्कृती विभागाचे सचिव सुनील अंचीपाका (आयएएस) यांनी सांगितले, “या वर्षी भारत व पोर्तुगालमधील राजनैतिक संबंध पुनर्स्थापनेचे 50वे वर्ष तसेच गोव्यात स्थापन झालेल्या फुंडासाओ ओरिएंतचे 30वे वर्धापन दिन वर्ष आहे. याचबरोबर, प्रथमच गोव्यातील कलाकार व पारंपरिक हस्तकला निर्माते लिस्बनमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्यातील समृद्ध परंपरा सादर केल्या. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हे एक अभूतपूर्व अनुभव ठरले आहे.”
बीटीएल लिस्बन 2025 मध्ये कला व सांस्कृती विभागाच्या सहभागामुळे गोवाचे जागतिक सांस्कृतिक गंतव्यस्थान म्हणून महत्त्व वाढले असून भारत आणि पोर्तुगालमधील सांस्कृतिक संबंध अधिक बळकट झाले आहेत.