‘ऐतिहासिक ठिकाणांचे पावित्र्य जपणे गरजेचे’
मडगाव :
गोवा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला मडगाव येथील ऐतिहासिक लोहिया मैदानाच्या पदपथावरील कमोड (संडास) भाजप सरकारचा उघड्यावर शौचमुक्त गोवा दर्शवितो. लोहिया मैदानाचे नूतनीकरण अद्याप अपूर्ण राहणे हे सर्वात दुर्दैवी आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
ऐतिहासिक लोहिया मैदानाच्या फूटपाथवर ठेवलेला कमोड आणि तेथील भिकाऱ्यांचा व्हिडिओ जारी करून, विरोधी पक्षनेत्यांनी भाजप सरकार ऐतिहासिक स्थळांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करत असून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करत असल्याचा आरोप केला.
On the eve of Goa Liberation Day, the Commode on the Footpath of Historic Lohia Maidan at Margao reflects the Open Defecation Free Goa under @BJP4India & @BJP4Goa Governments. Most unfortunate that refurbishment of Lohia Maidan still remains incomplete.1/2 pic.twitter.com/Bqh1nrTRAv
— Yuri Alemao (@Yurialemao9) December 18, 2022
गोवा मुक्ती चळवळीशी निगडीत स्मारके, दस्तऐवज आणि चिन्हे यांचे पुढील पिढीसाठी संरक्षण आणि जतन करणे आवश्यक आहे. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, ऐतिहासिक महत्त्वाची सर्व ठिकाणे अधिसूचित करा. ऐतिहासीक स्थळांचे नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण सर्वोच्च प्राधान्याने केले जाणे आवश्यक आहे, युरी आलेमाव म्हणाले.
गोव्यातील ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांच्या जतनाचा मुद्दा मी गेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मांडला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोहिया मैदान, आझाद मैदान, असोळणा व पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारके यासह इतर सर्व ठिकाणे अधिसूचित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू, सरकारने आतापर्यंत काहीही केले नाही असे युरी आलेमाव म्हणाले.
कुंकळ्ळी येथील चीफटेन्स मेमोरियलचेही नूतनीकरण आवश्यक आहे. असोळणा येथील लोहिया स्मारकालाही नूतनीकरणाची गरज आहे. या जागांकडे शासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न युरी आलेमाओ यांनी विचारला आहे.
आझाद मैदान, लोहिया मैदान आणि इतर स्मारके दारूड्या आणि समाजकंटकांची अड्डे बनली आहेत. परंतू सरकारी अधिकारी पात्र त्यांच्या उपद्रवाकडे डोळेझाक करत आहेत, युरी आलेमाव म्हणाले.