‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे!’
सरकारी काम म्हटले, की चिरीमिरी दिल्याशिवाय होणार नाही, ही भावना आता सर्वत्र रूढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयाबाहेर चक्क ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे’ अशा आशयाचा फलक लावत गैरमार्गाने काम करू इच्छिणाऱ्यांना एकप्रकारे चाप लावला आहे. भष्टाचार शिष्टाचार बनलेल्या सध्याच्या वातावरणात हा फलक सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
सतीश बुद्धे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते साताऱ्यात नुकतेच गटविकास अधिकारी म्हणून रूजू झाले आहेत. ते येथे रूजू होताच त्यांनाही गैरप्रकाराचे अनुभव येऊ लागल्याने अखेर त्यांनी आपल्या कार्यालयाबाहेर ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे’ अशा आशयाचा फलक लावला. बुद्धे यांचे पद आणि त्या अंतर्गत येणारी कामे ही थेट जनतेच्या संपर्काची असल्याने येथे सतत नागरिकांची वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर येथे येणाऱ्यांसाठी हा फलक सध्या चर्चेचा बनला आहे.