२४ रोजी इफ्फीत होणार ‘घर’चा प्रीमिअर…
पणजी :
सहित स्टुडिओची निर्मिती असलेल्या ‘घर’ या कोंकणी लघुपटाची यावर्षीच्या इफ्फि मध्ये गोवन सिनेमा- प्रीमिअर विभागात निवड झाली असून, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता पणजीतील आयनॉक्स सिनेगृहात याचा प्रीमिअर होणार आहे. पत्रकार किशोर अर्जुनने हा लघुपट लिहिला आणि दिग्दर्शित केला असून, झिरो माइल्सस्टोन फिल्म्स, सृजन थिएटर्स, विकास प्रोडक्शन्स हे या कोंकणी लघुपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून ‘सहित’च्यावतीने वेगवेगळे विषय सिनेमाच्या पडद्यावर आणले जात असून, नुकत्याच झालेल्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘सहित’ कुपांचो दर्यो या लघुपटाला नॉन फीचर्स विभागातील सगळेच्या सगळे सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सहित या सगळ्या कोंकणी लघुपटांनी सलग पाच वर्षे इफ्फिमध्ये तसेच देश विदेशातील महत्वाच्या चित्रपट महोत्सवात स्थान आणि पारितोषिके पटकावली आहेत.
या वर्षी निवड झालेल्या ‘घर’च्या निमित्ताने लघुपटाचे लेखक-दिग्दर्शक किशोर अर्जुन यांनी सांगितले कि, ‘सहितच्या वतीने आम्ही जे वेगवेगळे प्रयोग साहित्य -सिनेमा आणि कला क्षेत्रात करतो आहोत, त्याला रसिकांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे याहीवर्षी ‘घर’ची इफ्फित झालेली निवड हि आम्हा सगळ्यांसाठी मोठा उत्साह देणारी आणि कोंकणी सिनेमासाठी अजून नवे काही तरी ठोस करण्याची ऊर्जा देणारी ठरली आहे. या निवडीसाठी ईएसजी, इफ्फि आणि गोवन सिनेमा विभागाचे परीक्षक यांचे आम्ही आभारी आहोत. ‘घर’मधून आम्ही महत्वाच्या विषय घेऊन येत असून, आम्हाला खात्री आहे कि, आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की आवडेल.’
‘घर’मध्ये प्रसिद्ध कलाकार गौरी कामत, रोहित खांडेकर, रावी किशोर आणि बाल कलाकार शार्दूल बोरकार, विकास कासलीवाल यांनी भूमिका साकारल्या आहेत. माधुरी अशीरगडे आणि किशोर अर्जुन यांनी कथा लिहिली आहे, तर रवींद्र येमपाडा यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. सिंधुराज कामत यांनी पार्श्वसंगीत दिलेल्या या कोंकणी लघुपटाचे चित्रीकरण मडगाव, फोंडा, पणजी शहरात करण्यात आले आहे.



