
मडगाव : मडगावचे सुपुत्र, ख्यातनाम गोमंतकीय आणि प्रख्यात सिनेमाटोग्राफर के. वैकुंठ उर्फ वैकुंठ कुंकळीयेकर यांचा जन्मशताब्दी समारोप सोहळा मडगांवचो आवाजतर्फे इम्पिरियल हॉल, मडगाव येथे संपन्न झाला. या प्रसंगी युवा नेते प्रभव नायक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, भारतीय चित्रपटसृष्टी व गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीला दिलेल्या योगदानाबद्दल के. वैकुंठ यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी सरकारकडे मागणी केली.
या कार्यक्रमाला अमित कुंकळीयेकर व परिवार, ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ तसेच के. वैकुंठ यांचे चाहते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई यांनी के. वैकुंठ यांच्या जीवन व चित्रपट कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे निवेदन सादर केले. त्यानंतर के. वैकुंठ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. मडगांवचो आवाज तर्फे कुंकळीयेकर कुटुंबाचा सत्कार करून के. वैकुंठ यांच्या महान योगदानाचा गौरव करण्यात आला. तसेच गेल्या वर्षी निधन झालेले ए. वैकुंठ यांनाही आदरांजली अर्पण करण्यात आली.

कें वैकुंठ यांच्याबरोबर काम केलेले धर्मानंद वेर्णेकर व प्रसाद शिंक्रे यांनी के. वैकुंठ यांच्याविषयी आपली आठवण व अनुभव सांगितले. त्यांच्या साधेपणाची व कलात्मकतेची आठवण करून दिली. गोव्याचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत उंचावणाऱ्या या सिनेमाटोग्राफरचा वारसा जपण्याची गरज या कार्यक्रमातून अधोरेखित झाली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिने दिग्दर्शक लक्ष्मीकांत शेटगावकर यांनी के. वैकुंठ यांचे जीवन स्मारक उभारण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन गोमंतकीय चित्रपटसृष्टीला केले. वैष्णवी पै काकोडे हिने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
चित्रपट क्षेत्रातील डॉ. प्रमोद साळगांवकर, ज्योती कुंकळीयेकर, प्रिन्स जेकब, ख्रिस्त सिल्वा, दिनेश भोसले, मिरांशा नाईक, ज्ञानेश्वर गोवेकर, राजदीप नाईक, सुचित्रा नार्वेकर, मुकुंद शिंक्रे, स्वप्निल शेटकर, साईश पाणंदीकर यांसह इतरांचा त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मडगावचे माजी नगराध्यक्ष अजित हेगडे, एम. के. शेख, दिलीप प्रभुदेसाई, अवधूत कुडचडकर, विशाल पै काकोडे, अनिल पै, अतुल नायक तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.