
‘क्वेश्चन मार्क’साठी किशोर अर्जुनला पुरस्कार
अनुवाद लेखनासाठी प्रकाशक संघाकडून सन्मान
पणजी :
‘क्वेशन मार्क’ या कोंकणी नाट्यकृतीच्या मराठी अनुवादासाठी अनुवादक आणि ‘सहित’ प्रकाशक किशोर अर्जुनला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा ‘लेखक- प्रकाशक पुरस्कार’ शुक्रवारी जाहीर झाला. संघाच्या पुणेस्थित मुख्यालयात सदर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या वर्षी देशभरातून सुमारे ६३० पुस्तके प्रकाशक संघाला विविध विभागातील पुरस्कारांसाठी प्राप्त झाली होती.
लेखक, पत्रकार, अनुवादक, प्रकाशक, पटकथाकार आणि दिग्दर्शक असलेल्या किशोर अर्जुनला ‘क्वेश्चन मार्क या गौतम गावडे याने मूळ कोंकणी मध्ये लिहिलेल्या प्रायोगिक नाटकाच्या मराठी अनुवादकरणासाठी आणि सदर अनुवादाच्या प्रकाशनासाठी पुरस्कार जाहीर झाला. सदर नाटकाच्या प्रयोगाला गोव्यात कोंकणी आणि मराठी राज्य नाट्य स्पर्धेत उदंड प्रतिसाद लाभला असून विविध पुरस्कारांवरदेखील या नाटकाच्या प्रयोगाने आपली मोहोर उमटवली आहे. त्यातच आता या नाटकाच्या पुस्तकाने देखील हीच परंपरा राखत सदर पुरस्कार पटकावल्याबद्दल अनुवादक किशोर अर्जुन आणि लेखक गौतम गावडे या दोघांचेही कौतुक होत आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिकचे विश्वस्त विनायक रानडे, प्रसिद्ध चित्रकार वसुधा कुलकर्णी, नामवंत मुद्रक नंदप्रसाद बर्वे यांच्या परिक्षक मंडळाने या आणि विविध विभागातील इतर पुरस्कारांची निवड केली. प्रकाशक संघाच्यावतीने लवकरच पुणे येथे आयोजित होत असलेल्या विशेष कार्यक्रमात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ हि देशभरातील मराठी प्रकाशकांची शिखर संस्था आहे. त्यामुळे अशा संस्थेच्यावतीने जेव्हा गोव्यातील आमच्या प्रायोगिक नाटकांच्या अनुवादित पुस्तकाला पुरस्कार लाभतो तेव्हा आम्हा सगळ्यासाठी हि विशेष बाब आहे. कोंकणीमध्ये उत्तमोत्तम साहित्य आहे. आणि सहितच्या माध्यमातून आम्ही त्यांचा विविध भारतीय भाषेत अनुवाद प्रकाशित करून ते देशात सर्वदूर पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, आणि या आमच्या प्रयत्नांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे लेखक, अनुवादक आणि प्रकाशक म्हणून माझा उत्साह नक्कीच वाढला आहे.
– किशोर अर्जुन
लेखक- प्रकाशक, सहित प्रकाशन.