
लॉर्ना यांना ‘गोमंत विभूषण’ देण्याची मागणी
मडगाव: गोव्याच्या लाडक्या व महान गायीका बाई लॉर्ना आज आपल्या ८१व्या वाढदिवसानिमित्त, मडगांवचो आवाज आणि युवक नेते प्रभाव नाईक यांनी त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि पुढील संगीत प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पिढ्यानपिढ्या आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या बाय लॉर्ना या गोमंतकीय संस्कृती आणि ओळखीचं अजरामर प्रतीक आहेत, असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
सहा दशकांहून अधिक काळ बाय लॉर्ना यांनी गोवा, भारत आणि जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्यांची कालातीत कोकणी गीते केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, त्यांनी आपल्या राज्याची भाषिक व सांस्कृतिक परंपरा जपली आहे. तियात्रच्या रंगमंचापासून ते आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांपर्यंत त्यांनी गोव्याचे संगीत सन्मानाने आणि उत्कटतेने जगभर पोहोचवले, असे नायक म्हणाले.
कोकणी संगीताच्या प्रसारातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. असंख्य तरुण कलाकारांना कोकणी भाषा अंगीकारण्यास, गोमंतकीय परंपरा जपण्यास आणि संगीताला पिढ्यान्पिढ्या जोडण्यासाठी त्यांनी प्रेरित केले आहे. बाय लॉर्ना यांचे कलाकौशल्य केवळ गायनापर्यंत मर्यादित न राहता एक सांस्कृतिक चळवळ बनली आहे, असे प्रभव नायक यांनी नमूद केले.
त्यांच्या असामान्य कार्याची दखल घेऊन मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी गोवा सरकारकडे गोमंत विभूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान लॉर्ना यांना देण्याची मागणी केली आहे. “हा सन्मान त्यांना त्यांच्या आजीवन गोमंतकीय संगीत आणि संस्कृतीच्या वृद्धीकरिता केलेल्या कार्यासाठी योग्य ठरेल,” असे नायक म्हणाले.
तसेच, राज्य सरकारने बाय लॉर्ना यांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान त्यांना भारतातील सर्वात मान्यवर सांस्कृतिक विभूतींमध्ये स्थान देईल, असे नायक यांनी स्पष्ट केले.
या विशेष प्रसंगी प्रभव नायक यांनी बाय लॉर्ना यांच्या अद्वितीय प्रवासाला, त्यांच्या प्रेरणादायी आवाजाला आणि गोव्यावरील त्यांच्या अपार प्रेमाला सलाम केला. “त्यांच्या आयुष्यात आणखी अनेक वर्षे संगीत, आरोग्य आणि आनंद असो. गोव्याने त्यांना केवळ टाळ्यांनी नव्हे, तर राज्य आणि राष्ट्राचे सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करावा,” असे प्रभव नायक म्हणाले.