काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
काँग्रेसने त्यांच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४३ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाने गेल्या आठवड्यात त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत भाजपाने एकूण १९५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसने शुक्रवारी (८ मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकूण ३९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना छिंदवाडामधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या राहुल कस्वान यांना चुरू मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. यासह जोरहाटमधून गौरव गोगोई, सिलचरमधून सुरज्या खान, जालौरमधून अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत यांना उमेदवारी दिली आहे. या ४३ पैकी १३ उमेदवार ओबीसी आहेत. दुसऱ्या यादीनुसार काँग्रेसने अनुसूचित जातींमधील १०, अनुसूचित जमातींमधील ९, जनरल ९ आणि एक मुस्लीम उमेदवार दिला आहे.
दरम्यान, काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकूण ३९ नेत्यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल यांची नावे आहेत. काँग्रेसने राहुल गांधी यांना पुन्हा एकदा वायनाडमधून (केरळ) उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना त्यांच्या तिरुअनंतपुरम या मतदारसंघातूनच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.
…