‘का’ केले खासदार Mahua Moitra यांना लोकसभेतून बडतर्फ?
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आले आहे. लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या मोबदल्यात लाच घेतल्याच्या कथित आरोपांची चौकशी नितिमत्ता आयोगाकडून करण्यात आली होती. मोईत्रा यांना बडतर्फ करण्याची शिफारस आयोगाने केली होती. तसा अहवाल शुक्रवारी लोकसभेच्या पटलावर मांडण्यात आला.
लोकसभेत त्यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या कारवाईचा विरोध करत, विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहात जोरदार गदारोळ केला. मोईत्रा यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांचे खासदार सभागृहातून बाहेर पडले.
Mahua Moitra यांनी काय दिली प्रतिक्रिया ?
या कारवाईनंतर महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितिमत्ता समितीनं पुरावे नसताना ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीला कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असा दावा मोईत्रा यांनी केला.
महुआ मोईत्रा (Mahua Moitra) म्हणाल्या की, मला गप्प केल्याने अदानी प्रकरणातून आपली सुटका होऊ शकते, असे मोदी सरकारला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. त्या म्हणाले की, या कांगारू कोर्टाने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे की, अदानी तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि एका महिला खासदाराला त्रास देण्यासाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात.
त्या म्हणाल्या की, नीतिमत्ता समितीच्या अहवालात प्रत्येक नियम मोडला गेला आहे. मी 49 वर्षांची आहे आणि पुढची 30 वर्षे संसदेच्या आत आणि बाहेर तुमच्याशी लढत राहीन, असं त्या म्हणाल्या. मोइत्रा यांनी दावा केला की, त्यांच्या अहवालात जे काही नैतिक आढळले ते एकमेकांपासून भिन्न असलेल्या दोन लोकांच्या साक्षीवर आधारित होते.