लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत तीन दिवस तळ ठोकत भाजप उमेदवारांचा प्रचार केला. सावंत यांनी प्रचारसभासह नंतर पत्रकार परिषदेतून देखील अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली.
सावंत यांनी स्वाती मालिवाल, कथित अबकारी घोटाळा आणि आपच्या धोरणांसह नेत्यांच्या भ्रष्टाचारावर भाष्य केले. भाजपच्या देशभक्तीचा उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी दिवंगत मनोहर पर्रीकर आणि अरविंद केजरीवाल यांचा आयआयटीमधून शिक्षणाचा संदर्भ देत दोघांमध्ये काय फरक आहे हे देखील सांगितले. सावंत ‘द प्रिंट’ने घेतलेल्या एका खास मुलाखतीत बोलत होते.
‘मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. आम्ही गुड गव्हर्नन्स आणि ट्रान्सपरंट गव्हर्नन्स वरती विश्वास ठेऊन काम करतोय.’
‘दिवगंत मनोहर पर्रीकर एका राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांचे शिक्षण आयआयटीमधून झाले, त्यांच्याकडे बघा. आणि अरविंद केजरीवाल पण एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते देखील स्वत:ला आयआयटीयन असल्याचे सांगतात, पण भ्रष्टाचारात गुंतले आहेत.’
‘दोघांची तुलाना केली तर पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत देश आणि राज्यासाठी काम केले. तर, केजरीवाल पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात देखील गेलेले मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळतात,’ असे सावंत म्हणाले.
‘भारतीय जनता पक्षासाठी देश प्रथम, नंतर पक्ष आणि त्यानंतर मी असे धोरण आहे. तर, केजरीवालांसाठी पैसा प्रथम त्यानंतर स्वत: आणि शेवटी राज्य किंवा देश आहे. यासाठी ते काम करतात आणि म्हणूनच ते भ्रष्टाचारात गुंतलेत,’ अशी टीका सावंत यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीत असताना त्यांनी पत्रकार परिषदेतून देखील आपच्या अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. स्वाती मालिवाल प्रकरणात केजरीवाल गप्प का आहेत? त्यांचे मौन सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतात. आम आदमी पक्ष हा दिल्ली आणि महिला विरोधी असल्याचा आरोप, सावंत यांनी यावेळी केला.
तसेच, दिल्लीच्या कथित अबकारी धोरणाच्या घोटाळ्यातील पैसा गोवा, पंजाब आणि गुजरातच्या निवडणुकीत वापरल्याचा आरोपही सावंत यांनी केला. सावंत यांनी देशात पुन्हा एनडीए आघाडीचे सरकार येत असल्याचा दावा केला.