मिलिंद नार्वेकरांना शिंदेंकडून उमेदवारीची ऑफर!
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जशा जवळ येतायत तसे राजकीय पक्ष एकमेकांना कशाप्रकार धक्केदेतील सांगता येत नाही. आता महायुती उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आणि विश्वासू यांनाच आपल्या गटात खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महायुती उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मिलिंद नार्वेकरांना शिंदेकडून उमेदवारीची ऑफर दिली गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महायुतीला येथे योग्य उमेदवार सापडत नाहीय. मनसे महायुतीमध्ये आल्यानंतर बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपण बिनशर्थ पाठींबा दिल्याचे जाहीर केले. दरम्यान भाजपकडून मंगलप्रभात लोढा या मतदार संघासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. या चर्चा सुरु असताना मिलिंद नार्वेकरांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मिलिंद नार्वेकर यांना 2 ते 4 दिवसात पक्षप्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आणि अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाला मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून जावे लागते. गुवाहटीला गेलेल्या शिंदे आणि आमदारांसोबत समेट घडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांना पाठवले होते. मिलिंद नार्वेकर यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर मिलिंद नार्वेकरही शिंदेसोबत जातील, अशी चर्चा सुरु होती. दरम्यान आता निवडणूक जवळ आल्यानंतर या चर्चेला पुन्हा वेग आला आहे.