
राज्य बनत आहे अवैध दारू व्यापाराचे केंद्र : आप
पणजी:
गोवा राज्य अवैध दारू व्यापाराचे केंद्र बनत असून अबकारी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने राज्यात मोठे घोटाळे सुरू आहेत, असा आरोप आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी गुरुवारी केला आहे.
गुजरातमधील आंतरराज्यीय दारू तस्करी प्रकरणाचे मूळ गोव्यात आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गावर जप्त केलेले दारू तसेच बेळगाव येथे कर्नाटक पोलिसांनी जप्त केलेले दारू, यावरून गोवा अवैध दारू व्यापारासाठी हॉटस्पॉट होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अबकारी खाते, गोवा पोलीस आणि राज्य सीमा चेक पोस्ट यांची युती झाली असून यांच्यामुळेच बेकायदेशीर दारूच्या व्यापाराला चालना मिळत आहे. दुर्दैवाने अबकारी खात्याचे मंत्रीपद भूषविणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या गैरप्रकाराला आळा घालण्यात कुचकामी ठरले आहेत, अशी खंत पालेकर यांनी व्यक्त केली.
या दारू घोटाळ्यात विविध औद्योगिक वसाहतींमधील डिस्टिलरी महत्त्वाचे घटक आहेत. यांच्यामुळेच राज्यात बनावटी दारूचा निर्यात वाढत आहे. प्रत्येक डिस्टिलरीमध्ये अबकारी खात्याचे अधिकारी असताना राज्याबाहेर बेकायदेशीररित्या दारू कसे निर्यात होऊ शकते? यावरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हे काम होत असल्याचे स्पष्ट होत आहे. अबकारी खाते घोटाळ्याचे केंद्र बनले आहे. खात्यातील नियुक्तीपासून ते बदल्यापर्यंत लाचखोरी खूप सामान्य बनले आहे, असे मत पालेकर यांनी व्यक्त केले. लाचखोरीचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने सीमा चेक पोस्ट्सवर देखरेख करण्यासाठी आप स्वयंसेवकांना एकत्रित करणार आहे.
आपचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई यांनी सांगितले की, मत मिळविण्याच्या उद्देशाने ड्राय स्टेट गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वी दारूचा अवैध व्यापार केला जात होता आणि त्याचे मूळ गोव्यातच होते. नुकत्याच झालेल्या गुजरातमधील आंतरराज्यीय अवैध दारू व्यापार प्रकरणाचा उगम देखिल काणकोण येथे आहे.
गुजरातच्या मंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी याच काणकोणच्या घाऊक विक्रेत्याकडून दारू खरेदी करून गुजरातमध्ये वितरित केल्याचा दावा त्यांनी केला. काणकोण प्रदेशात 14-15 बार परवाने जारी केले असूनही, बारची वास्तविक संख्या याच्याशी जुळत नाही, यावरून बेकायदेशीर दारूच्या व्यापारात सरकारचा सहभाग असल्याचे स्पष्ट होते.