
वेव्हज फिल्म बाजार 2025 चा उत्साहात समारोप
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये वेव्हज फिल्म बाजार 2025 चा एका दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. सळसळत्या उत्साहाचा संचार असलेल्या वातावरणात विचारांची देवाणघेवाण, जागतिक सहकार्य आणि लक्षवेधी चित्रपट प्रदर्शनामुळे या पाच दिवसांच्या कार्यक्रमाने एक वेगळा ठसा उमटवला. या कलात्मक अभिरुचीचे चोखंदळ मूल्यमापन करणाऱ्या या बाजारपेठेत जगभरातील नामांकित चित्रपट निर्माते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, वित्त पुरवठादार आणि उदयोन्मुख प्रतिभा यांची एकाच व्यासपीठावर मांदियाळी जमल्यामुळे सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचा उत्सव पाहायला मिळाला.

या समारंभाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ. अजय नागभूषण एम. एन. आणि डॉ. के. के. निराला, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, वेव्स फिल्म बाजारचे सल्लागार जेरोम पैलार्ड, इफ्फीचे महोत्सव संचालक शेखर कपूर, प्रख्यात चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी आणि श्रीराम राघवन तसेच आंतरराष्ट्रीय अभिनेत्री रेचल ग्रिफिथ्स यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
चित्रपट क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली म्हणून एक मिनिट मौन पाळून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. नागभूषण यांनी वेव्हज फिल्म बाजारच्या 20 व्या आवृत्तीचे अधिक मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याचे आश्वासन दिले. मगदूम यांनी यापूर्वी निवडलेल्या प्रकल्पांना मिळालेल्या यशावर भर दिला आणि स्वतंत्र प्रतिभेची जोपासना करण्यासाठी एनएफडीसीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
या महोत्सवातील महत्त्वाच्या घडामोडींचे दर्शन घडवणारा एक विशेष समारोपाचा व्हिडिओ प्रदर्शित करून या समारंभातला उत्साह आणि सन्मानाला साजेशा वातावरणाची निर्मिती करण्यात आली.

प्रमुख पुरस्कारांची ठळक वैशिष्ट्ये :
वेव्हज फिल्म बाजारने को-प्रॉडक्शन मार्केट, वर्क-इन-प्रोग्रेस लॅब, स्क्रिप्ट लॅब आणि नवीन एआय-चालित विभागांमधील उत्कृष्ट प्रकल्पांना सन्मानित केले.
- काकथेट( इडियट)- प्रथम सहनिर्मिती अनुदान ($10,000)
- उल्टा(मॅडम) – द्वितीय सहनिर्मिती अनुदान ($5,000)
- सिंहस्थ कुंभ– विशेष माहितीपट अनुदान ($5,000)
- द मॅनेजर, अझी, उस्ताद बंटू – रेड सी फंड पुरस्कार
- नजमा का तडका – प्लॅटून वन स्क्रिप्ट डेव्हलपमेंट ग्रँट
- टीचर्स पेट, व्हाईट गाय – कास्टिंग कंपनी पुरस्कार
- 7 टू 7 – यूसीसीएन सिटी ऑफ फिल्म बेस्ट प्रोजेक्ट पुरस्कार
निर्मिती-पश्चात यश
पोस्ट-प्रॉडक्शनमधील यश खोरिया, अझी, द इंक स्टेनड हँड अँड द मिसिंग थंब, बॉर्न यस्टरडे, आक्काट्टी आणि खामोश नजर आते हैं यांसारख्या विजेत्या प्रकल्पांना नुबे स्टुडिओज, प्रसाद कॉर्पोरेशन, मूव्हीबफ आणि इतरांकडून मोठे सहकार्य मिळाले.
प्रिमियर गॅप फंडिंग आणि वितरण
- एकोज ऑफ द हर्ड – मॅचबॉक्स गॅप पुरस्कार
- सोल व्हिस्पर्स – M5 ग्लोबल फिल्म फंड
- रचिंगम – रिबॉर्न इंडिया नाट्य वितरण पुरस्का
एआय चित्रपट महोत्सव आणि सिनेमाएआय हॅकेथॉनः पहिल्यांदाच आयोजित जागतिक उपक्रम:
एलटीआयमाइंडट्री च्या पाठबळाने आयोजित केलेल्या या वर्षीच्या एआय शोकेसमध्ये 18 पेक्षा जास्त देशातून प्रवेशिका आल्या. चित्रपट निर्मितीमधील अत्याधुनिक नवोन्मेषाचा बहुमान करण्यात आला.
- कायरा- सर्वोत्तम एआय ऍनिमेशन
- द सिनेमा दॅट नेव्ह वॉज- सर्वाधिक नवोन्मेषी एआय चित्रपट
- नागोरी- सर्वोत्तम एआय लघुपट
विशेष उल्लेख: द लास्ट बॅकअप फायनल पार्ट, मिरॅकल ऑन द कछुआ बीच
सिनेमएआय हॅकथॉनने जलद-गती सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले, ज्यामध्ये ध्वनी, दृश्ये, कथाकथन, नवोन्मेष आणि सर्वोत्कृष्ट एआय चित्रपट ( द रेड क्रेयॉन) यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
उदयोन्मुख प्रतिभेवर प्रकाशझोत
स्टुडंट प्रोड्युसरच्या कार्यशाळेत काशवीय ओम्कार, अनिकेत जोशी, राधिका किनारे, रिया वर्गीस आणि साक्षी मिश्रा यांसारख्या उत्कृष्ट युवा निर्मात्यांचा गौरव करण्यात आला, ज्यांनी भारतीय सिनेमाच्या आश्वासक भविष्याचे दर्शन घडवले.
वेव्हज् फिल्म बाजारच्या प्रमुख विनिता मिश्रा यांच्या आभार प्रदर्शनाने समारंभाची सांगता झाली, त्यानंतर संपूर्ण टीम मंचावर उपस्थित झाली. अविश्वसनीय सहभाग, सशक्त भागीदारी आणि दूरदर्शी कथाकथनासह आणि 2026 मध्ये आणखी मोठी, अधिक भव्य आवृत्ती घेऊन येण्याच्या हमीने वेव्हज् फिल्म बाजार 2025 चा समारोप एका उच्च स्तरावर झाला आहे.





