पुण्यातील ‘या’ तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी
पुणे:
पक्षी निरीक्षण करणाऱ्या पक्षीप्रेमींना अडथळा होत असल्याचे आणि सुरक्षेचे कारण पुढे करून महापालिकेच्या उद्यान विभागाने अविवाहित जोडप्यांना पाषाण तलाव परिसरात बंदी घालण्याचा फतवा काढला आहे.
पुणे महापालिका आणि परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी संस्थांकडून पाषाण तलावाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. तलावात मैलापाणी येऊ नये, जलपर्णी वाढू नये, परिसरातील जैवविविधता कायम राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाषाण तलावाच्या परिसरात वृक्षांची संख्या मोठी असल्याने तेथे विविध जातीच्या पक्षांचे वास्तव्य आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणाची आवड असणारे पक्षीप्रेमी पाषाण तलावाच्या परिसरात येतात. या ठिकाणी प्रेमी युगुलेही फिरण्यासाठी येतात. मात्र, त्यांच्यामुळे पक्षी निरीक्षणामध्ये अडथळे येत असल्याच्या तक्रारी आहेत.
याबाबत पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पक्षीप्रेमींनी पालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या उद्यान विभागाने हा निर्णय घेतला आहे. पक्षी निरीक्षण करणाऱ्या नागरिकांना अडथळा होत असल्याने पाषाण तलावाच्या परिसरात अविवाहित जोडप्यांना फिरण्या-बसण्यावर बंदी घातली असून सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचा दावा महापालिकेने केला आहे.