
‘ऑप्ट्रास्कॅन’ला अमेरिकन एफडीएची ५१०(के) मान्यता
मुंबई : डिजिटल पॅथॉलॉजी आणि प्रतिमा विश्लेषण क्षेत्रातील ऑप्ट्रास्कॅन इन्क. या कंपनीच्या ‘ऑप्ट्रास्कॅन सिस्टीम’ला अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) कडून ५१०(के) मान्यता (K260755) मिळाली आहे. या मान्यतेमुळे स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या डिजिटल पॅथॉलॉजी तंत्रज्ञानाला महत्त्वपूर्ण बळ मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.
कॅलिफोर्निया येथे मुख्यालय असलेल्या ऑप्ट्रास्कॅनमधील बहुसंख्य हिस्सा मोलबायो डायग्नॉस्टिक्स लिमिटेडने २०२५ मध्ये विकत घेतला होता. एफडीएच्या मान्यतेत ओएस-अल्ट्रा होल स्लाइड स्कॅनर, रंगीत डिस्प्ले मॉनिटर, इमेजपाथ इमेज मॅनेजमेंट सॉफ्टवेअरवर आधारित वर्कस्टेशन तसेच एचईआर२ इमेज अॅनालिसिस सॉफ्टवेअरचा समावेश आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, ही प्रणाली पॅथॉलॉजिस्टना दैनंदिन निदान प्रक्रियेत एचईआर२ (HER2) पातळीचे अचूक परीक्षण आणि मूल्यांकन करण्यास मदत करते. स्तनाच्या कर्करोगाचा प्रकार निश्चित करून योग्य उपचारपद्धती निवडण्यासाठी एचईआर२ चाचणी महत्त्वाची मानली जाते. जगभरातील पॅथॉलॉजी प्रयोगशाळा डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करत असल्याने इमेज अॅनालिसिस तंत्रज्ञानाचा वापरही वाढत आहे.
ऑप्ट्रास्कॅनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभी घोलप यांनी सांगितले की, एफडीएची ५१०(के) मान्यता मिळणे हा कंपनीच्या जागतिक विस्तारातील महत्त्वाचा टप्पा आहे. या मान्यतेमुळे अमेरिका, भारत आणि इतर देशांतील रुग्णालये, निदान प्रयोगशाळा, वैद्यकीय शिक्षण संस्था आणि संशोधन क्षेत्रात कंपनीच्या तंत्रज्ञानावरील विश्वास अधिक दृढ होईल, असा दावा त्यांनी केला.
डॉ. लाल पॅथलॅब्सच्या मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. रीना नाक्रा यांनी सांगितले की, डिजिटल पॅथॉलॉजीचे महत्त्व सातत्याने वाढत असून एफडीएची मान्यता मिळाल्यामुळे ऑप्ट्रास्कॅनच्या प्लॅटफॉर्मची गुणवत्ता आणि क्लिनिकल विश्वासार्हता अधोरेखित झाली आहे. त्यामुळे डिजिटल पॅथॉलॉजीचा अधिक व्यापक वापर होण्यास चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.






