‘स्मार्ट सिटी’त झाला आहे मोठा भ्रष्टाचार : काँग्रेस
पणजी :
‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातील भ्रष्टाचाराची व्याप्ती खूप मोठी आहे, त्यामुळे केंद्रीय शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांचा पर्दाफाश करण्याची हिंमत असल्यास त्याची चौकशी करावी असे काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी म्हटले.
‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावर काँग्रेसच्या टिप्पणीला पुष्टी नसल्याच्या पुरी यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना गोम्स म्हणाले की, भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी भाजप सरकारने आपली हिंमत दाखवावी.
गोम्स यांनी बुधवारी काँग्रेस हावस येथे पत्रकार परिषद घेतली आणि चौकशी न करता स्मार्ट सिटी प्रकल्पातून भ्रष्टाचार सुरूच ठेवल्याबद्दल भाजपवर टीका केली. यावेळी जीपीसीसी मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस विजय भिके आणि पणजी महिला गटाध्यक्षा लविनिया डिकॉस्ता उपस्थित होते.
“पुरी यांनी सरकारचे मुखपत्र असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचा वापर करून आमच्यावर आरोप केले आहेत. प्रत्यक्षात पणजीतील लोकांना भेटून त्यांना स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या निकृष्ट कामामुळे कसा त्रास होतो हे विचारण्यात ते अपयशी ठरले,” असे गोम्स म्हणाले.
“फक्त न्यायालयीन तपास या घोटाळ्याची तीव्रता उघड करू शकेल. जर भाजपचे नेते या भ्रष्टाचाराचे वाटेकरी नसतील तर ते चौकशीचे आदेश देण्यास का टाळाटाळ करत आहेत,’’ असा सवाल गोम्स यांनी केला.
‘‘या प्रकल्पात भ्रष्टाचार झाला आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी केंद्रीय दक्षता आयोगाला आदेश द्यावा आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. पणजीचे भाजप आमदार आणि महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी पणजी ‘स्मार्ट सिटी’चे सुरू असलेले काम दर्जाहीन असल्याचे मान्य केले असताना, आमचे आरोप फेटाळून आमच्यावर टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे गोम्स म्हणाले.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह नगरविकास मंत्री, नगरविकास सचिव, मुख्य सचिव, महापालिकेचे आयुक्त, स्मार्ट सिटीचे अधिकारी हे सर्व दोषी आहेत. “ते मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करण्याचे धाडस भाजप करणार नाही,’’ असे ते म्हणाले.
‘‘बाबुश यांनी बरोबरच म्हटले आहे की, सल्लागाराला 8 कोटी रुपये विनाकारण दिले जातात. जेव्हा मंत्री भ्रष्टाचार कबूल करतात, तेव्हा भ्रष्टाचाराचे पुरावे देण्याची गरजच नाही,’’ असे गोम्स यांनी म्हटले.
पणजीकर म्हणाले की, काँग्रेस जनतेचे प्रश्न मांडणार असून स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचारावर गप्प बसणार नाही.
“आम्ही जे काही आरोप केले आहेत ते बिनबुडाचे नाहीत. तिथे काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही श्री पुरी यांना शहरात पदयात्रा करायला सांगितले होते. पण तसे न करताच ते दिल्लीला पळून गेले,” असे पणजीकर म्हणाले.
स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामांना भेट दिल्याचे श्री.पुरी यांचे वक्तव्य त्यांनी फेटाळून लावले.
“तुम्ही (मीडिया आणि लोकांनी) श्री पुरी यांना पणजीत पदयात्रा करताना पाहिले आहे का? ते कुठल्या वाहनातून आले होते? इथे येऊन त्यांनी काय केले?,’ असे सवाल पणजीकर यांनी केला.
“निकृष्ट कामाचा फायदा कोणाला होईल हे आम्हाला माहीत आहे. स्मार्ट सिटीच्या कामाचा पर्दाफाश प्रसारमाध्यमांनी केला आहे. या मंत्र्याला (पुरी) मंत्रिमंडळातून काडले पाहिजे. तो पुन्हा इते आल्यास आम्ही त्याला काळे झेंडे दाखवू,” असे पणजीकर म्हणाले.
पणजीकर म्हणाले की, येथे सुकाणू समितीही अस्तित्वात नाही. “श्री. पुरीजी, आम्ही तुम्हाला पणजीत पदयात्रा काढण्याचे आव्हान करतो. इथे धोक्याची क्षेत्रे कोठे आहेत हे दाखवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काळे झेंडे घेवून फिरू,” असे पणजीकर म्हणाले.
भिके म्हणाले की, सध्या स्मार्ट कमिशनचा पर्दाफाश होत आहे. स्थानिक आमदारानेही याचा पर्दाफाश केला आहे.
‘‘आमचे आरोप बिनबुडाचे असेल तर खुल्या चर्चेसाठी या. आम्हाला माहित आहे या भ्रष्टाचारात केंद्राचा सुद्धा हात आहे,” असे भिके म्हणाले.