प्रकाश सिंह बादल यांचे निधन
अमृतसर:
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले, ते दीर्घकाळ आजारी होते. प्रकाश सिंह बादल यांनी चंदीगडच्या फोर्टिस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकाश सिंह बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 रोजी पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील अबुल खुराना गावातील जाट शीख कुटुंबात झाला होता. प्रकाश सिंह बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. याशिवाय, ते केंद्र सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.
शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांना आठवडाभरापूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले होते, जिथे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.
दरम्यान, पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश सिंह बादल यांना गेल्या वर्षी जूनमध्ये गॅस्ट्र्रिटिस आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड नंतरच्या आरोग्य तपासणीसाठी त्यांना फेब्रुवारी 2022 मध्ये मोहाली येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये बादल यांना कोरोना विषाणूची लागण झाली आणि त्यांना लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये प्रकाश सिंह बादल यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 1957 मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले. यानंतर 1969 मध्ये पुन्हा निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले. 1970 मध्ये प्रकाश सिंह बादल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, मात्र ते या पदावर केवळ एक वर्ष राहिले. यानंतर ते 1977-80, 1997-2002, 2007-2012 आणि 2012 ते 2017 पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री होते. याशिवाय, ते लोकसभेचे सदस्य आणि केंद्र सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.