
भारताच्या सहकार्याने फिलिपिन्स करतो आहे क्षयरोग निर्मूलन
पणजी : क्षयरोगाच्या (टीबी) रुग्णसंख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या पाच देशांत गणना होणाऱ्या फिलिपिन्ससमोर, दरवर्षी अंदाजे १,९०,००० नोंद न झालेल्या क्षयरोग रुग्णांचा शोध घेणे व त्यावर उपचार करणे, ही मोठी आव्हाने आहेत. सन २०२७ पर्यंत आपल्या देशातील क्षयरोगाचे २१ लाख रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचे उद्दिष्ट संयुक्त राष्ट्रसंघाने फिलिपिन्सला दिले आहे. त्यानुसार, समुदाय-स्तरीय तपासणी व निदान क्षमता मजबूत करण्यासाठी भारतात बनवलेल्या नाविन्यपूर्ण ट्रूनॅट® प्रणाली आणि अतिशय पोर्टेबल क्ष-किरण यंत्रांचा वापर वाढवण्याचा संकल्प फिलिपिन्सच्या आरोग्य विभागाने केला आहे.
सध्या फिलिपिन्समध्ये ६८ ट्रूनॅट® यंत्रे कार्यरत असून, त्याद्वारे क्षयरोग, एचआयव्ही, एचपीव्ही, हिपॅटायटिस बी आणि सी तसेच इतर अनेक आजारांच्या जलद व बहुव्याधी आण्विक चाचण्या घेणे शक्य झाले आहे. बंटायन बेटांवरील एका पायलट प्रकल्पाने या तंत्रज्ञानाच्या परिवर्तनक्षमतेची प्रचंड ताकद दाखवून दिली असून, क्षयरोगाचे निदान करण्यामध्ये तब्बल १००८ टक्के इतकी वाढ साध्य केली आहे.
क्षयरोगाचे निदान करण्याच्या ‘मोलबायो’च्या उपाययोजनांना ‘डब्ल्यूएचओ’ने मान्यता दिलेली आहे आणि ‘आयसीएमआरने’ही त्या मंजूर केल्या आहेत. फिलिपिन्सच्या भौगोलिक रचनेमुळे तेथे दळणवळणात उद्भवणाऱ्या अडचणी, प्रयोगशाळेत करावयाच्या चाचण्यांचा कमी वापर, तसेच तेथील ग्रामीण व बेटांवरील समुदायांना उपलब्ध होणाऱ्या मर्यादित वैद्यकीय सुविधा अशा मोठ्या अडथळ्यांवर मात करण्यात ‘मोलबायो’च्या सोल्युशन्सने मदत होत आहे. फिलिपिन्सच्या अन्न व औषध प्रशासनाने नुकतीच ‘प्रोरॅड अॅटलस’ अल्ट्रापोर्टेबल क्ष-किरण यंत्रास मंजुरी दिल्याने, क्षयरोगाची अखंडित व संपूर्ण तपासणी आणि रोगाचे निदान या प्रक्रियांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे क्षयरोगावर त्वरीत उपचार करता येणे तेथे शक्य होणार आहे.
फिलिपिन्स प्रतिनिधीमंडळाच्या भारत दौर्याचा एक भाग म्हणून, फिलिपिन्सचे आरोग्य सचिव मान. डॉ. टिओडोरो जे. हर्बोसा यांनी गोव्यातील मोलबायो डायग्नॉस्टिक्सच्या सुविधेला भेट दिली. भारताच्या स्वदेशी स्क्रिनिंग तंत्रज्ञानाशी भागीदारीबाबत ते म्हणाले, “फिलिपिन्समध्ये क्षयरोगाविरुद्धची लढाई अधिक तीव्र करत असताना, भारतासोबतचे सहकार्य मिळणे ही नावीन्यपूर्ण व दीपस्तंभासारखी प्रेरणा आहे. ट्रूनॅट® प्रणालीसारख्या भारतात विकसित झालेल्या स्थानिक तंत्रज्ञानाचा आमच्या आरोग्य व्यवस्थेत समावेश होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जलद व विश्वासार्ह आण्विक निदान क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्रूनॅट® तंत्रज्ञानामुळे क्षयरोग तपासण्या जलद व अचूकपणे होतात. त्यामुळे क्षयरोग नियंत्रणात आणण्याच्या आमच्या क्षमतेत वाढ होत असून आमच्याकडील दुर्गम भागांमध्ये क्षयरोग संपवण्याच्या उद्दिष्टाला बळ मिळत आहे. ही भागीदारी भारत आणि फिलिपिन्स यांच्यातील व्यापक व अधिक मजबूत होत चाललेल्या द्विपक्षीय संबंधांचा एक भाग आहे. या दोन्ही देशांमध्ये परस्पर व्यापार आता ३ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. भारत हा औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि निदान तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा पुरवठादार असून, आमच्या आरोग्य व्यवस्थेच्या प्रगतीत त्याचा मोठा वाटा आहे. आरोग्य, तंत्रज्ञान, व्यापार आणि संरक्षण या क्षेत्रांत सहकार्याने निर्णय घेतल्यास गंभीर आव्हानांना कशा प्रकारे सामोरे जाता येते आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करून दोन्ही देशांत आरोग्य क्षेत्रातील प्रगतीसोबत आर्थिक समृद्धीलाही चालना कशी मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमची ही भागीदारी आहे.”
फिलिपिन्ससोबतच्या आपल्या सुरू असलेल्या सहकार्याच्या भाग म्हणून, ‘मोलबायो डायग्नोस्टिक्स’तर्फे १४ व १५ ऑगस्ट २०२५ रोजी मनीला येथे होणाऱ्या ३१व्या फिलिपिन कोअॅलिशन अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस (फिलकॅट) वार्षिक अधिवेशनात एक प्रभावी पॅनेल चर्चेचे आयोजन होणार आहे.
संसर्गजन्य व असंसर्गजन्य अशा ४० हून अधिक आजारांच्या चाचण्या समाविष्ट असलेल्या आपल्या पोर्टफोलिओद्वारे, मोलबायो कंपनी जगभरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांना सोयीस्कर वहनक्षमता, वेग आणि अचूकता यांचा संगम साधून बळकट करते. ‘मोलबायो’च्या सुरू असलेल्या संशोधनांमध्ये ‘आरटीडीटू टीबी नेटवर्क’च्या सहाय्याने चालणारा एक बहुराष्ट्रीय प्रकल्पही आहे. मुलांमधील आणि एचआयव्ही / एड्सग्रस्तांमधील क्षयरोगाचे निदान सुधारण्यासाठी त्यांच्या जीभेवरील स्वॅबवर आधारित नवीन आण्विक निदान पद्धतीचा शोध यामध्ये घेतला जातो.
“एखाद्या दुर्गम बेटांवर असोत किंवा दुर्लक्षित ग्रामीण भागांत थेट समुदायांपर्यंत तपासणी सेवा पोचवून आपण क्षयरोगाचे निदान व त्यावरील उपचार यांच्यातील तफावत दूर करू शकतो. यातूनच फिलिपिन्सचे क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल. जगभरातील संसर्गजन्य आजारांविरुद्धची लढाई बळकट करण्यासाठी, आणि देशांना अधिक लवचिक व प्रतिसादक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यास सहाय्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे ‘मोलबायो डायग्नोस्टिक्स’चे अध्यक्ष शिवा श्रीराम यांनी सांगितले.