‘हे’ गाव संध्याकाळनंतर टिव्ही मोबाईल ठेवणार बंद…
कुसुंबी (महेश पवार) :
माता काळेश्वरीच्या नावाने सुप्रसिद्ध असलेलं तीर्थक्षेत्र आणि नाचणीचे गाव म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या कुसुंबी गावातील समस्त ग्रामस्थांनी मुलांच्या अभ्यास वेळेतील अडथळा दूर होवून त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी सर्वांसाठी आदर्शवत असा अनोखा निर्णय घेतला आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत गावातील सर्वांनी आपल्याकडील टीव्ही व मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी सर्वसंमतीने घेतला असून त्याचे परिसरातील जनतेतून जोरदार स्वागत होऊ लागले आहे.
तीर्थक्षेत्र कुसुंबीची ग्रामदेवता माता काळेश्वरीच्या मंदिरात ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबीचे लोकनियुक्त सरपंच मारुती चिकणे, पोलिस पाटील एकनाथ सुतार, माजी उपसरपंच जगन्नाथ चिकणे, नेहरू युवा मंडळ अध्यक्ष श्रीकृष्ण चिकणे, उपाध्यक्ष अजय कुंभार, सचिव जितीन वेंदे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव चिकणे (गुरुजी), अशोक चिकणे तसेच नेहरू युवा मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुलांना अभ्यास करता यावा त्यातून त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी तसेच मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत टीव्ही, मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांनी घेतला आहे. या निर्णयाचे कुसुंबीसह मेढा परिसरातील जनतेनं जोरदार स्वागत केलं आहे.
पालकांनी आपल्या पाल्यांना अभ्यासासाठी बसविणे, त्यांचा अभ्यास करून घेण्याचे ठरविण्यात आले. मंदिरातील ध्वनीक्षेपकवरुन वेळोवेळी सर्व ग्रामस्थांना (पालकांना) पूर्व सूचना दिल्या जाणार आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन याप्रसंगी सरपंच मारुती चिकणे, पोलिस पाटील एकनाथ सुतार, नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण चिकणे यांनी केले आहे.