
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘दुर्गा’चे नव्वदीत पदार्पण
सातारा (महेश पवार):
केवळ व्यवसाय वृद्धी न पाहता वाठार स्टेशन येथील दुर्गा खानावळ सामाजिक बांधिलकी जोपासण्यातही नेहमीच अग्रेसर राहिली आहे. स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीकारकांना भोजन पुरविणाऱ्या या खानावळीने आता नव्वदव्या वर्षात पदार्पण केले आहे.
२२ मे १९३४ रोजी कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे दुर्गा खानावळीचा शुभारंभ झाला होता. ब्रिटिश राजवटीत इंग्रज अधिकारी बेनझी यांनी लोकांच्या जेवणाच्या सोयीसाठी श्रीमती सोनुबाई जाधव व दुर्गा जाधव यांना शुद्ध शाकाहारी जेवणासाठी परवाना दिला होता. स्वातंत्र्य पूर्व काळापासून क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर, पांडू कचरे या ठिकाणी जेवायला येत होते. पोष्टाच्या पिशवीतून डोंगरभागात लपलेल्या क्रांतीकारकांना दुर्गा खानावळीचे जेवण जात असे. क्रांतीकारकांना जेवण दिल्यामुळे दोघींना कित्येकदा तुरुंगात डांबले जायचे. असा इतिहास या खानावळीचा आहे.


सोनुबाई यांचे चिरंजीव जेष्ठ पत्रकार वसंतराव जाधव आणि त्यांच्या पत्नी सौ. विमल जाधव यांनी हि खानावळ मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने पुढे सुरु ठेवली. आज त्यांची चौथी पिढी हा वारसा चालवत आहे. आज दुर्गा खानावळ नव्वदीची झाल्याने इथे जेवणाचा आस्वाद घेणाऱ्या असंख्य ग्राहकांनी जाधव कुटुंबियांचे अभिनंदन केले.