![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2023/10/794934213Satara_Koyna_Dam_Main-780x470.jpg)
उरमोडी चा पाणी प्रश्न पेटणार ? उरमोडीच्या काठावरील शेती धोक्यात…
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील पावसाचे माहेरघर म्हणून ओळखणाऱ्या जिल्ह्यातील पश्चिम भागात म्हणावा असा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून सातारा तालुक्यातील परळी खोर्यात असणाऱ्या उरमोडी धरणाचा पाणी साठा अवघा 5.52 TMC शिल्लक राहिला आहे. यामुळे आगामी काळात पाऊस पडला नाही तर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
यामुळे भविष्यात उरमोडीच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती देखील धोक्यात येणार असून त्या पाठोपाठ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पाऊस कमी झाल्याने ऊस लागवड क्षेत्र देखील कमी होणार आहे . यामुळे भविष्यात या दुष्काळजन्य परिस्थितीचा कारखानदारांना देखील मोठा फटका बसणार.
![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2023/08/Shivendraraje-Bhosale-1024x576.jpg)
खरंतर उरमोडी धरणात ५.५२ TMC पाणी साठा जरी शिल्लक असला तरी यातील ३.५ TMC सातारकरांसाठी राखीव असला तरी तो पुढील सात महिने पाणी कसं पुरणार असा सवाल भागातील शेतकरी करत आहेत, तसेच माण खटाव तालुक्याला देखील दोन TMC पाणी पुढचं सात महिने कसं पुरणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यामुळे भविष्यात माण खटाव पाठोपाठ पावसाळी प्रदेश म्हणून ओळखले जाणारया परळी खोर्यात देखील दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण होऊन भविष्यात उरमोडी चा पाणी प्रश्न पेटू शकतो यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी धरणात शिल्लक असलेल्या पाण्याचं योग्य नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती मिळत असुन नेमकं उरमोडीच्या पाण्याचं नियोजन कसं असणार याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.