कास परिसरातील ‘ती’ १५५ बांधकामे होणार अधिकृत
सातारा (महेश पवार) :
प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कास आणि परिसरातील १५५ मिळकतधारकांनी केलेली बांधकामे अधिकृत करण्यात यावीत आणि पर्यटनाबरोबरच त्यांचा व्यवसाय सुरु राहावा यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. मुंबई विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व १५५ बांधकामे अधिकृत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून यापुढे होणाऱ्या नवीन बांधकामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमावली ठरवून द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. या निर्णयामुळे कास परिसरातील स्थानिकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे.
कास आणि परिसरात स्थानिक भूमिपुत्रांनी रोजीरोटी सुरु राहण्यासाठी बांधकामे करून व्यवसाय सुरु केले होते. सुमारे १५ वर्षांपासून स्थानिकांचे व्यवसाय सुरु आहेत. दरम्यान, कास परिसरातील १५५ बांधकामे अनधिकृत असून ती हटवावीत अशी नोटीस प्रशासनाने काढली होती. त्यामुळे सर्व मिळकतधारकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सदरची बांधकामे अधिकृत करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. मंगळवारी आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून विधानभवनात मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी यासंदर्भात बैठक बोलावली होती.
शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, कास परिसरातील स्थानिक शंकरराव जांभळे, श्रीपती माने, सोमनाथ जाधव, संपत जाधव, अशोक जाधव, मुंबईचे नगरसेवक विजय माने, पुण्यातील नगरसेवक उंबरकर, धनंजय जांभळे, विक्रम पवार, अंकुश मोरे यांच्यासह मिळकतधारक उपस्थित होते.
बैठकीला मुख्यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, पर्यावरण विभाग, टाऊन प्लॅनिंग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सातारचे तहसीलदार राजेश जाधव, जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्यासह संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सविस्तर चर्चेअंती मुख्यमंत्री शिंदे यांनी कास परिसरातील १५५ बांधकामे अधिकृत करण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. पर्यावरण, एम.एस.आर.डी.सी., आर.पी. टाऊन प्लॅनिंग आदी नियमांना कोठेही बाधा पोहचत नसल्याने हि सर्व बांधकामे अधिकृत करण्यात आली असून ०.५ एफ.एस.आय. नुसार हि बांधकामे बसत आहेत, त्याच पद्धतीने यापुढे कास परिसरात नव्याने बांधल्या जाणाऱ्या बांधकामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमावली तयार करावी आणि परवानगी द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. बैठकीत १५५ मिळकतधारकांची बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय झाल्याने गेल्या काही वर्षांपासून मिळकतधारकांच्या डोक्यावर प्रशासनाकडून ‘अनधिकृत बांधकामे’ नावाची टांगती तलवार अखेर दूर झाली आहे.
एम.एस.आर.डी.सी.चे विभागीय कार्यालय साताऱ्यात :
या बैठकीत होऊ घातलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. या प्रकल्पात सातारा आणि जावली तालुक्यातील काही गावे नव्याने समाविष्ट करण्यात यावीत आणि सर्वांच्या सोयीसाठी प्रकल्पाच्या अनुशंगाने एम.एस.आर.डी.सी.चे विभागीय कार्यालय साताऱ्यात सुरु करावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केली. एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मंजुरी देत आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितलेली सातारा आणि जावली तालुक्यातील गावे नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये समाविष्ट करा, तसेच एम.एस.आर.डी.सी.चे विभागीय कार्यालय साताऱ्यात सुरु करा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
आ. शिवेंद्रसिंहराजेंमुळे भूमिपुत्रांना मिळाला न्याय
बैठकीत १५५ बांधकामे अधिकृत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिल्याने उपस्थित मिळकतधारकांनी सुटकेचा निस्वास टाकला. सर्वांच्या पाठीशी आ. शिवेंद्रसिंहराजे खंबीरपणे उभे होते. त्यांनी सुरुवातीपासूनच सर्व बांधकामे अधिकृत करण्यासाठी स्वतः सक्रिय राहून पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळेच आमची बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय झाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंमुळेच आम्हा भूमिपुत्रांना न्याय मिळाला असून आम्ही त्यांचे आभार मानतो, अशी भावनिक प्रतिक्रिया शंकरराव जांभळे यांनी बैठकीनंतर व्यक्त केली.