आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम
कराड, प्रतिनिधी :
राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा शुक्रवारी (दि. १७) वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त शुक्रवारी दिवसभर आ. पृथ्वीराज चव्हाण कराड येथे उपस्थित राहणार आहेत. शुभेच्छा स्वीकार, निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान व रात्री स्नेहमेळावा या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे व काँग्रेसचे युवानेते इंद्रजीत चव्हाण यांनी दिली.
माजी केंद्रीय मंत्री (स्व.) आनंदराव चव्हाण व माजी खा. प्रेमलाकाकी चव्हाण यांची शिकवण, आचार व विचारांच्या मुशीतून तयार झालेले पृथ्वीराजबाबा प्रथम १९९१ मध्ये काँग्रेस (इं) पक्षातून कराड मतदार संघातून लोकसभेवर निवडून आले. १९९६ व १९९८ च्या निवडणुकीत ते पुन्हा लोकसभेवर निवडून आले. २००२ ते २००८ या कालावधीत त्यांनी लोकसभेवर प्रतिनिधीत्व केले. संसदेच्या सार्वजनिक उपक्रम, विज्ञान व तंत्रज्ञान, वित्त व नियोजन, लोकलेखा, ऊर्जा आणि संगणकीकरण इत्यादी महत्वाच्या समित्यांवर त्यांनी काम केले. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री म्हणून काम केले.
भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी विश्व संसदीय संघटनेच्या लंडन, पॅरिस, जिनेव्हा आणि टोकियो येथील अधिवेशनामध्ये त्यांनी भारतीय संसदेचे प्रतिनिधीत्व केले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने १९९५ च्या इंग्लंडच्या सत्ताधारी हुजुर पक्षाच्या वार्षिक अधिवेशनात ते प्रतिनिधी होते. १९९८ मध्ये ते पहिल्या भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाच्या दौऱ्यावर ते पाकिस्तानला गेले.
१९९३ मध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या कार्यकारिणीवर ते प्रथम निवडून आले. संसदीय पक्षाचे उपप्रतोद, सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवडून येत राष्ट्रीय प्रवक्ते, आर्थिक धोरण समिती सदस्य, आत्मचिंतन समिती सदस्य, धोरण व निर्धारण समितीचे अध्यक्ष, केंद्रीय निरीक्षक आदी महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले आहे. व अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले. यातून त्यांनी गुजरात, कर्नाटक, जम्मू काश्मीर, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर व सिक्कीम या राज्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी पेलली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी देशपातळीवरील कामाचा अनुभव पाठीशी असल्याने कार्याची अविस्मरणीय छाप उमटवली. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, टोल फ्री १०८ रुग्णवाहिका या ऐतिहासिक निर्णयाबरोबर त्यांनी सर्वसामान्यांचे जीवन सुखी राहणाऱ्या अनेक योजना व कामे साकारली.
तशाच प्रकारे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात हजारो कोटींच्या विकासकामातून त्यांची विकासाची प्रतिमा आणखी आश्वासक झाली. त्यांचा शुक्रवारी वाढदिवस साजरा होत आहे. त्यादिवशी पहाटे त्यांचे कराड येथील निवासस्थानी मुंबईवरून आगमन होईल. ते सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत निवासस्थानी शुभेच्छा स्विकारणार आहेत. त्यानंतर राखीव व दुपारी साडेचार वाजता कराड – मलकापूर रोडवरील बैलबाजार येथे होणाऱ्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानास ते उपस्थित राहणार आहेत. व रात्री सात वाजलेपासून दहा वाजेपर्यंत मलकापूर येथील डी मार्ट शेजारच्या भारती विद्यापीठाच्या ग्राऊंडवर होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्यात उपस्थित राहून ते शुभेच्छा स्विकारणार आहेत.