
सातारा
‘राजं, मेघडंबरीच्या दिखाव्यापेक्षा सातारकरांना हवाय विकास…’
सातारा (महेश पवार) :
सातारा (satara) शहरात खासदार उदयनराजे यांच्या संकल्पनेतून ग्रेड सेपरेटर वर मेघडंबरी बसविण्यात आले असून यामुळे ऐतिहासिक लूक आला आहे परंतु या मेघडंबरीला लाखो रुपये खर्च करून ते बसवून सातारकरांचा नेमका काय फायदा अशी संबंध सातारकरांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे.
ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा (satara) शहरात असलेल्या ऐतिहासिक राजवाडा चोरीला जात असताना , राजवाड्याकडे दुर्लक्ष करून मेघडंबरी साठी लाखों रुपये खर्च करण्यापेक्षा ऐतिहासिक राजवाडा जतन करण्यासाठी खर्च केला असता तर काय फरक पडला असता ?अशी संतप्त भावना सातारकरांमधून व्यक्त होत आहे.
सातारा ही ऐतिहासिक आणि मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखली जाते , याचं राजधानी साताऱ्याच्या नगरपालिकेवर कधी उदयनराजे भोसले तर कधी शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे सत्ता राहिली . परंतु तरीदेखील सातारचा म्हणावा इतका विकास झाला नाही . सातारा शहरातील रस्त्यांचा प्रश्न असेल सांडपाण्याचा प्रश्न असेल किंवा महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न, त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न ,पाणी पुरवठ्यासह अनेक सुविधांचा वणवा असताना देखील मेघडंबरी साठी लाखो रुपये खर्च करण्यामागचा हेतू काय , यामुळे राजधानी सेल्फी पॉईंट नंतर सातारकरांना नवीन दिखावा म्हणजे मेघडंबरी उभारण्यात आले की काय अशी जोरदार चर्चा सातारा शहरात सुरू आहे . यामुळे सातारकरांना सेल्फी पॉईंट पेक्षा साताऱ्याचा खरा विकास हवाय असे दिखावे नकोत अशी जनमानसातून प्रतिक्रिया उमटत आहे.