‘का’ झाली द. गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली?
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून 1 हजार रुपयांची वर्गणी जमा करण्याचा वादग्रस्त आदेश जारी करणाऱ्या दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांची एका आदेशान्वये तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आश्विन चंद्रू ए. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज सायंकाळी उशिरा पर्सनल खात्याचे अव्वल सचिव एहांत सावंत यांनी राज्यपालांच्या वतीने हा आदेश जारी केला. ज्योती कुमारी यांची सध्या गोवा मनोरंजन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कुमारी यांनी हा वर्गणी गोळा करण्याचा आदेश जारी केला होता. हा आदेश समाज माध्यमावर व्हायरल झाल्यावर एक मोठा गदारोळ माजला होता. महसूल मंत्री बाबुश मोंसेरात यांनी या प्रकारा बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना कुमारी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते.
प्रजासत्ताक दिनाचा कालचा सोहळा पार पडल्यावर आज तडकाफडकी हा आदेश जारी करण्यात आला.