करंडी येथील लेवेच्या क्रशर विरोधात ग्रामस्थ रस्त्यावर…
सातारा :
तालुक्यातील परळी खोऱ्यातील करंडी गावानजीक असलेल्या क्रशरविरोधात ग्रामस्थ एकवटले . करंडी गावाच्या मागील बाजूस असलेल्या क्रशरमुळे गावातील ग्रामस्थ आता अस्वस्थ झालेत.
या ठिकाणी खाणीमध्ये रोजच होणारं ब्लास्टिग यामुळे घरांना धोका निर्माण झाला असून याठिकाणी होणाऱ्या क्रशीग मुळे आरोग्याचा तसेच शेतीवर धुळी मुळे परिणाम होत असून , या क्रशर वरून जड वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या अमर्यादित वाहतूकीमुळे परिसरात झालेल्या रस्त्यांची चाळण झाली असून या वाहतूकीमुळे स्थानिकांना त्रास होत आहे.
या सगळ्या विरोधात करंडी येथील ग्रामस्थांनी अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी थेट गावातून जनजागृती मोर्चा काढत गावच्या चौकात मिटिंगमध्ये या क्रशर विरोधात आवाज उठवला. यावेळी गावातील शेकडो ग्रामस्थ विशेष करून वृध्द व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते, यावेळी क्रशर बंद झालेच पाहिजे अशा आशयाच्या घोषणा दिल्या.
तसेच यापुर्वीच जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव मंजूर करून हे क्रशर बंद करण्याचीही मागणी करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. सध्या या क्रशरचा परवाना संपला असल्याची माहिती समोर येत असून जिल्हा प्रशासनाने खात्री करून तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी व ते क्रशर बंद करावे अशी मागणी स्थानिक पातळीवर होत आहे. जर क्रशर बंद केले नाही तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून ते बंद पाडतील या सर्वांची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील असं स्थानिकांचे मत आहे.
करंडी येथील लेवे यांच्या क्रशरला सुरू होण्यापूर्वी विरोध असताना देखील परवानगी देण्यात आली कशी ? यासंबंधी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतः उपजिल्हाधिकारी यांना परवानगी देऊ नये म्हणून पत्र दिले असताना देखील त्यावेळी परवानगी दिली गेली ?यामुळे ग्रामस्थांचा विरोध असताना देखील जिल्हा प्रशासनाने कोणत्या परवानगी दिली ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.