‘न्यूजलाईन पुरस्कारामुळे अंधारात पणती लावण्याचे कार्य’
कराड (प्रतिनिधी) :
एखाद्या देशाची समाजाची मानसिक स्थिती ही येथील वर्तमानपत्रांचे पहिले पान दाखवत असते. ज्यावेळी सगळीकडे अंधार असतो त्यावेळी अंधाराला शिव्या देऊन अंधार नाहीसा होत नाही, तर अंधारामध्ये पणती लावायची असते. अन् ती पणती लावण्याचे कार्य आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने न्यूज लाईन समुहाने केले आहे. जगामध्ये न्यूज व्हॅल्यु ही सकारात्मतेला असून ती खर्या अर्थाने न्यूज लाईन व माध्यमांनी जपली असल्याचे गौरवोद्गार प्रसिध्द व्याख्याते, शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंद्रजित देशमुख यांनी काढले.
न्यूज लाईन चॅनलेच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहामध्ये आयोजित न्यूज लाईन सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मोहन राजमाने होते तर प्रांताधिकारी उत्तम दिघे, न्यूज लाईन माध्यम समुहाचे मुख्य संपादक प्रमोद तोडकर, कार्यकारी संचालक सागर बर्गे, सहसंपादक अमोल टकले, कार्यकारी संपादक सुहास कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महनीय व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यामध्ये कराड अर्बन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणारे सीए दिलीप गुरव यांचा उत्तम व्यवस्थापक पुरस्काराने तर प्रा. डॉ. विनोद बाबर यांचा प्रेरणादायी वक्ता, सौ. कल्पना तानाजी वाकडे यांचा संस्कारदीप, राजेंद्र जाधव यांचा प्रयोगशील शेतकरी, नामदेव थोरात यांचा उद्योजकता प्रेरणा, आदर्श समाजसेवक म्हणून संदीप पवार यांचा, सौ. मिनल ढापरे यांचा कलारत्न, मनोज जगताप यांचा उदयोन्मुख उद्योजक, नवोदित साहित्यिक पुरस्काराने अभयकुमार देशमुख यांचा, राहुल पुरोहित यांना अक्षरांचा जादुगर पुरस्काराने तर कुमारी आदिती जाधव हिला लक्ष्यवेधी नेमबाज म्हणून तर डॉ. दत्ता कुंभार यांना संगीतरत्न पुरस्कार, आरोग्यासाठी कार्यरत असलेल्या प्रीतिसंगम हास्य परिवार या संस्थेचाही आरोग्यदायी हास्यतुषार पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
इंद्रजित देशमुख म्हणाले, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो। सकळांचे लक्ष तुजकडे वळो। मानवतेचे तेज झळझळो। विश्वामाजी या योगे। या संत तुकडोजी महाराज यांच्या अभंगानुसार समाजासाठी गौरवशाली कार्य करणार्या व्यक्तींचा न्यूज लाईन पुरस्कार देऊन सन्मान होत आहे. न्यूज लाईनचा शुभारंभ झाला आणि तीन महिन्यातच कोरोना सारख्या भीषण महामारीला सामोर जावे लागले. त्या परिस्थितीत मानवाचा संघर्ष न्यूज लाईनला दिसला असल्यामुळे त्यांच्या कामात सकारात्मकता आली अन् त्यांना मानवतेचा शोध लागला. प्रतिकूल स्थितीतच माणसं सकारात्मक राहतात. हीच वस्तुुस्थिती पुरस्कार वितरणातून दिसली आहे. देशामध्ये द्वेष आणि मत्सर याच्यावर बाजार चालतो आहे. द्वेष पेरणार्या जाहीराती सध्या बाजारात दिसत आहेत. कपडे, साबण, गृहोपयोगी वस्तूंच्या जाहीराती प्रामुख्याने पहायला मिळत आहेत. कोरोना कालावधीतील दीड वर्षाच्या विश्रांतीमध्ये न्यूज चॅनेललने गरूड झेप घेतली. गरूड पक्षाचे आयुर्मान 70 वर्षाचे असते मात्र वयाच्या 40 व्या वर्षी पंखांमध्ये पिसांचा भार वाढतो, नख्या, चोच वाकडी होते. यावेळी उंच ठिकाणी 150 दिवस विश्रांती घेऊन गरुड चोच घासतो व नवीन चोच आल्यानंतर पिसे, निखे काढून टाकतो व नवीन पंख आल्यानंतर पुन्हा झेपावतो. याचप्रमाणे दीड वर्षाच्या कालावधीमध्ये न्यूज लाईन चॅनेलने दातृत्व, सकारात्मक जोपासून पुन्हा गरूडझेप घेतली आहे.
यशस्वी माणसांची लक्षणे सांगताना ते म्हणाले, यशस्वी माणसे उत्साही असतात. ढोंगी माणसे यशस्वी होत नाहीत.स्वतःशी प्रामाणिक असणारीच माणसे यशस्वी होतात. चेहरे बदलणारी माणसे तत्कालीन खोटं बोलून यशस्वी झाली असतील मात्र चिरंतर यशस्वी झाली नाहीत. जगण्याला प्रेरणा देणार्या गोष्टींचे जीवन मुल्य महत्वाचे असून 77 टक्के लोक सत्तेसाठी तर 22 टक्के पद, प्रतिष्ठा, पैशासाठी जगतात मात्र केवळ 1 टक्काच लोक दुसर्याचं जगणं समृध्द करत करत आपलं जगणं समृध्द करतात, हे खर्या अर्थाने जगण्याचे उच्चतम मुल्य आहे. मानवी जीवनाला समृध्द करणार्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले आहेत. न्यूज लाईनने निवडलेल्या पुरस्कारकर्त्यांमधील एक एक पुरस्कर्ता हिरा आहे.
भारतीय प्रजासत्तक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरामध्ये ज्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजो तो सकारात्मतेचा विचार सभागृहात झाला आहे असे सांगून देशमुख म्हणाले, अंधारात असताना पणती आणि मशाला लावायला पाहिजे. विनोबा म्हणतात भष्ट्राचाराला माझा विरोधी नाही मात्र भ्रष्टाचार्याला मिळणार्या प्रतिष्ठेला विरोध आहे, असेही ते म्हणाले.
सीए दिलीप गुरव, प्रा. सतिश घाडगे, प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी सत्काराल उत्तर दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संपादक प्रमोद तोडकर यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक सागर बर्गे यांनी मानले. कार्यक्रमास कराड शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हास्य ही गंभीर समस्या…
सध्या लोक प्रतिष्ठा, सभ्यतेमुळे हसत नसल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे वयाच्या चाळीशीनंतर विविध व्याधींना सामोरे जावे लागत आहे. याचबरोबर प्रशासकीय अधिकार्यांच्या केबिनमध्ये दिवसभरातील वातावरण हे सारखे गार-गरम असते. यामुळे अशा अधिकार्यांची अवस्था अतिशय वाईट असते. त्यामुळे मी प्रशासकीय सेवेत असताना मोबाईलमध्ये कायम स्व. दादा कोंडके यांच्या विनोदी चित्रपटाच्या फिती ठेवायचो आणि वेळ मिळाला की त्या पाहून स्वतःला फ्रेश करायचो. आणि उमदा मनुष्यच हासू शकतो, संकुचित हासू शकत नाही तसेच सत्तेचा माज, संपत्तीची मस्ती, ज्ञानाचा हंकार असणारा मनुष्य हासू शकत नाहीत, असेही देशमुख म्हणाले.
‘सोन्याचा खांब जपायचा आहे…’
इंद्रजित देशमुख महाविद्यालयीन जीवनातील आठवण सांगताना म्हणाले, बीड येथील त्यांच्या मित्र कायम सांगायचा माझ्या घरातील सोन्यांचा खांब मला आयुष्यभर जपायचा आहे. या उत्सुकतेपोटी त्यांचे सर्व मित्र बीडला त्याच्या घरी गेल्यानंतर घराचे सर्व खांब तपासून पाहिले मात्र त्यांना सोन्याचा खांब कोठेच सापडला नाही. त्यावेळी त्यांच्या बीडच्या मित्राने चुलीसमोर इरकली लुगड्यातील आईकडे बोट दाखवून म्हणाला हाच माझा सोन्याचा खांब असून तो मला आयुष्यभर जपायचा आहे, यावेळी सभागृहातील उपस्थितांना गहिवरून आले