google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

कराड दक्षिणेत भाजप नेते अतुल भोसलेंना धक्का ; दक्षिणेत कॉंग्रेस तर उत्तरेत राष्ट्रवादीचा वरचष्मा

कराड (अभयकुमार देशमुख) :

कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सुरळीत पार पडली. यामध्ये कराड दक्षिणेत काँग्रेस तर उत्तरेत राष्ट्रवादीचा ग्रामपंचायतीवर वरचष्मा पाहायला मिळाला. कराडमध्ये यंदा भाजपाला मोठा धक्का बसला असून अनेक मोठ्या ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. या निवडणुकीत अंतवडी, किवळ, आटके, तळबीड, सुपने, जुने कवठे, वडगाव हवेली, कोरेगाव, आणे या ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. हिंगनोेळे व पश्‍चिम सुपने येथे प्रयेकी एक उमेदवार चिठ्ठीद्वारे नशिब आजमावे लागले. दरम्यान हनुमानवाडी ग्रामपंचायतीसाठी तब्बल 48 वर्षानंतर निवडणूक झाली. तारुख व चोरजवाडी येथे अपक्षउमेदवार सरपंचपदी विजयी झाले.

कोरेगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून येथे आमदार बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलला दणदणीत विजय मिळवला आहे. सहकार पॅनेलचे ज्येष्ठ नेते व जनता बझारचे माजी चेअरमन वसंतराव पाटील कोरेगावकर यांनी केले. सहकार पॅनेलचे सरपंच पदासह 8 उमेदवार विजयी झाले. तर विरोधी पॅनेलला केवळ दोन जागा मिळाल्या. आनंदराव उर्फ बाळासाहेब पाटील हे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले.

वडगाव हवेली ग्रामपंचायतीत जगदीश जगताप गटाची बाजी
वडगाव हवेली ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवत कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप गटाने बाजी मारली आहे. सरपंचासह 11 उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले. या ठिकाणी काँग्रेसचे नेते बंडानाना जगताप यांचे पुत्र सुरज जगताप सरपंच पदासाठी अपक्ष उभे राहिले होते. मात्र मतदारांनी त्यांना नाकारले.

आटके ग्रामपंचाय – महाविकास आघाडी
आटके ग्रामपंचायतीत पस्तीस वर्षानंतर सत्तांतर झाले. भाजप तालुकाध्यक्ष धनाजी पाटील यांच्या गटाचा दारून पराभव झाला. या ठिकाणी सर्वपक्षीय महाविकास आघाडीचे सरपंच पदासह आठ उमेदवार विजयी झाले आहेत. तर धनाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे केवळ पाच उमेदवार विजयी झाले. या ठिकाणी कृष्णा कारखाना, कृष्णा बँकेचे विद्यमान संचालक सर्वपक्षीय महाविकास आघाडीत सामील झाले होते. धनाजी पाटील यांची एकाकी झुंज अपयशी ठरली.

चरेगाव ग्रामपंचायत – राष्ट्रवादी
चरेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पतंगराव माने यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे दहा उमेदवार विजयी झाले. सुरेश माने गटाचे तीन उमेदवार विजयी झाले. येथे पतंगराव माने गटाचे सरपंच पदाचे उमेदवार देवदत्त माने चांगल्या मतांनी विजयी झाले.

सुपने ग्रामपंचायत – राष्ट्रवादी
सुपने ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवत बलराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सरपंच पदासह आठ जागा मिळवत सत्ता संपादन केली. मंत्री शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मानणारी प्रकाश पाटील यांच्या पॅनेलला चार जागांवर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. सरपंच विश्रांती पाटील विजयी झाल्या आहेत.

किवळ ग्रामपंचायत – राष्ट्रवादी
किवळ ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. येथे 12/0 असा निकाल लागला आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत एक हाती सत्ता स्थापन केली. येथे सत्तांतर झाले आहे. काँग्रेसचे वैभव साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा येथे दारूण पराभव झाला.

कवठे – काँग्रेस
कवठे ग्रामपंचायतीत वीस वर्षानंतर सत्तांतर घडवत येथे काँग्रेसने बाजी मारली आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण व उंडाळकर गटाच्या नेतृत्वाखालील श्री जोतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलनने सरपंचपदासह सात जागेवर विजय मिळवला. सह्याद्रि कारखान्याचे संचालक, राष्ट्रवादीचे लालासाहेब पाटील व सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्रि ग्रामविकास पॅनेलला केवळ तीन जागेवर समाधान मानावे लागले.

अंतवडी – राष्ट्रवादी
अंतवडी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली आहे. येथे जिजाबा शिंदे, माजी सरपंच युवराज शिंदे यांच्या नेतृत्वाखालील श्री सिध्देश्‍वर पॅनेलने सरंपचपदासह आठ जागेवर विजय मिळवत सत्ता कायम ठेवली. तर विरोधी प्रविण शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सिध्देश्‍वरी जोगेश्‍वरी माता पॅनेलला केवळ दोन जागा मिळाल्या.

पाडळी-हेळगाव – राष्ट्रवादी
पाडळी-हेळगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन तानाजीराव जाधव व अरविंद जाधव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने सरपंच पदासह 9 जागा मिळवल्या. तर विरोधातील बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालाील हेळजाई पॅनेलला एक जागा मिळाली.

येळगाव – काँग्रेस
येळगाव ग्रामपंचायतीत उंडाळकर गटाची सत्ता कायम राहिली आहे. मन्सूर इनामदार यांचा करिश्मा कायम राहिला असून त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या सरपंचपदासह 9 जागा तेथे निवडून आल्या आहेत.

तळबीड – काँग्रेस
तळबीड ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन तेथे उमेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता आली आहे. तेथे मोहिते यांच्या पॅनेलला सर्वजागांवर म्हणजे 14 जागांवर विजय मिळाला आहे.

कुसूर – भोसले, उंडाळकर गट
कुसूर ग्रामपंचायतीत डॉ. अतुल भोसले व अ‍ॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर गटाने दहा पैकी दहा जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली.

जुळेवाडी –
जुळेवाडी ग्रामपंचायतीत स्व. डी. एस. सोमदे पॅनेलने सरपंचपदासह 12 पैकी 11 जागा मिळवत सत्ता कायम ठेवली. तर विरोधी अधिक सोमदे यांच्या गटाला फक्त 1 जागेवर समाधान मानावे लागले.

पश्‍चिम सुपने – राष्ट्रवादी
पश्‍चिम सुपने ग्रामपंचायतीत उंडाळकर गटाच्या रयत पॅनेलला चार तर राष्ट्रवादीला सरपंचपदासह तीन जागा मिळाल्या. एका जागेसाठी समसमान मते मिळाल्याने चिठ्ठील टाकून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी घोषत झाल्याने राष्ट्रवादीने 9 पैकी 5 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली.

आणे – भाजप
आणे ग्रामपंचायतीत डॉ. अतुल भोसले गटाने सरपंचपदासह सहा जागा मिळवत सत्तांतर घडवले. तर महाविकास आघाडीला तीन जागांवर समाधान मानावे लागले.

हिंगनोळे – कॉँग्रेस
हिंगनोळे ग्रामपंचायतीत कॉँग्रेसची सत्ता कायम राहिली असून काँग्रेसला सरपंचपदासह पाच जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य विजयी मिळाले तर चिठ्ठीद्वारे राष्ट्रवादीचा आणखी एक सदस्य विजयी झाला. अशी राष्ट्रवादी सदस्य संख्या पाच झाली आहे.

डेळेवाडी – राष्ट्रवादी
डेळेवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असून सरपंचपद रिक्त आहे. राष्ट्रवादीला चार जागा व मंत्री शंभूराज देसाई व उंडाळगर गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. तर विद्यमान सरपंच तात्यासाहेब बाबर यांना या निवडणुकीत पराभवला सामोरे जावे लागले.

कासारशिरंबे – कॉँग्रेस
कासारशिरंबे ग्रामपंचायतीत आमदार पृथ्वीराज चव्हाण व अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या गटाने सरपंच पदासह सहा जागांवर विजय मिळवून सत्ता कायम ठेवली तर विरोधी डॉ. अतुल भोसले गटाला पाच जागा मिळाल्या.

रेठरे खुर्द – मोहिते, भोसले गट
रेठरे खुर्द ग्रामपंचायतीत आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाने सरपंच पदासह दोन जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते गटाने सहा जागा तर डॉ. अतुल भोसले गटाने तीन जागा जिंकल्या.

मनव – काँग्रेस
मनव ग्रामपंचायतीत सरपंचपदासह सात जागा मिळवत उंडाळकर गटाने सत्ता कायम ठेवली तर विरोधी गटाला दोन जागा मिळाल्या.

हनुमानवाडी – राष्ट्रवादी
हनुमानवाडी ग्रामपंचायतीसाठी तब्बल 48 वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गतच तीन पॅनेलमध्ये लढत झाली. यामध्ये श्री भैरवनाथ लोकनियुक्त ग्रामविकास पॅनेलने सरपंचपदासह सहा जागांवर विजय मिळवला. तर काळभैरवनाथ परिवतन पॅनेलने दोन जागांवर मिळवला. तर तिसर्‍या हनुमान ग्रामविकास पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही.

विजयनगर
विजयनगर ग्रामपंचायतीत माजी आमदार आनंदराव पाटील यांची सत्ता कायम राहिली. येथे यापूर्वी पाच सदस्य बिनविरोध निवडून आले होते. दोन सदस्य व सरपंच अशा तीन जागांसाठी निवडणूक लागली होती. या तीनही जागांवर माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखलील महाकाली पॅनेलने विजय मिळवला.

तारूख – काँग्रेस (उंडाळगर गट)
तारूख ग्रामपंचायतीत उंडाळगर गटाचे पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप पाटील यांची सत्ता कायम राहिली. मात्र तेथे सरपंचपदासाठी अपक्ष उमेदवार असलेल्या सचिन कुर्‍हाडे यांनी बाजी मारली. कोरोना काळात त्यांनी केलेले काम सरपंचपदाच्या रुपाने त्यांच्या पथ्यावर पडले.

ओंडोशी
ग्रामपंचायतीत सत्ता उंडाळकर गटाची तर सरपंच डॉ. अतुल भोसले यांच्या गटाचा अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे सत्ता येऊनही उंडाळकर गटाला सरपंचपदापासून तेथे वंचित रहावे लागले आहे.

दुशेरे – भाजप
दुशेरे ग्रामपंचायतीत भाजपाने सत्ता कायम राखली. कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने तेथे सहा जागा जिंकल्या तर काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. चोरजवाडी ग्रामपंचायतीत गावातील गटाअंतर्गतच लढत झाली. त्यामध्ये अपक्ष सरपंच निवडून आले.

धावरवाडी
धावरवाडी ग्रामपंचायतीत बाळासाहेब चोरेकर यांच्या गटाची सत्ता आली आहे.

घोलपवाडी –
घोलपवाडीमध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पहिल्यादाच महाविकास आघाडीचा सरपंच तेथे झाला आहे. वनवासमाची-खोडशी ग्रामपंचायतीत अ‍ॅड. उदयसिंहपाटील उंडाळकर व डॉ. अतुल भोसले यांच्या गटाची सत्ता आली आहे. त्यांच्या पॅनेलला सहा जागा मिळाल्या असून विरोधी पॅनेलला मतदारांनी तीन जागांवर रोखले.

कालगाव
कालगावग्रामपंचायतीत राष्ट्रवादी सत्ता कायम राहिली आहे. येथे पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने पाच जागा मिळवल्या तर भाजपा व काँग्रेस पुरस्कृत पॅनेला चार जागा मिळाल्या. सरपंचपद यापूर्वीच बिनविरोध झाले आहे.

वानरवाडी येथे सर्वच्या जागा बिनविरोध झाल्या होत्या. केवळ सरपंचपदासाठी निवडणूक झाली. या ठिकाणी आमदार पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील उंडाळकर गटाच्या उमेदवार यशोदा तोडकर विजयी झाल्या.

शामगाव ग्रामपचांयतीत तिरंग लढत झाली. यामध्ये संमिश्र यश मिळाले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 4, भाजपा 3, काँग्रेस 2 असे उमेदवार विजयी झाले तर सरपंच काँग्रेसचा विजयी झाला.

गणेशवाडी ग्रामपंचायतीत सरपंचपदासह सहा बिनविरोध होऊन एक जागांसाठी निवडणूक झाली. काँग्रेस अंतर्गतच निवडणूक झाली असून यामध्ये उंडाळकर गटाच्या उमेदवाराने बाजी मारली.

दीड तासात सर्व निकाल जाहीर
प्रशासनाने मतमोजणीचे नेटके नियोजन केले होते. सकाळी साडे आठ वाजता टपाली मते मोजण्यास प्रारंभ झाला. 9 वाजता प्रत्यक्ष मोजणीस प्रारंभ झाला. साडेदहा वाजेपर्यंत सर्व 33 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर करण्यात आले. तहसीलदार विजय पवार, नवासी नायब तहसीलदार आनंद देवकर यांनी केलेल्या नियोजनामुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली.


चिठ्ठीवर उघडले उमेदवाराचे नशिब
हिंगनोळे, पश्‍चिम सुपने येथील प्रत्येकी एक उमेदवाराल समान मते मिळाली. यामुळे तेथे चिठ्ठीवर विजयी उमेदवार घोषीत करण्यात आला. पश्‍चिम सुपने येथे प्रियांका विशाल चव्हाण व सुजाता रमेश चव्हाण यांना 106 मते मिळाली. चिठ्ठीने उंडाळकर गटाच्या सुजाता रमेश चव्हाण विजयी झाल्या. हिंगनोळे येथे संतोष साहेबराव थोरात व शामराव पांडुरंग थोरात यांना 210 मते मिळाली. यामध्ये चिठ्ठीने राष्ट्रवादीचे संतोष थोरात हे चिठ्ठीवर विजयी झाले.


पोलीस प्रशासनाचे नियोजनबध्द बंदोबस्त
ग्रामपंचायत निविडणूक जाहीर झाल्यापासून मतमोजणी प्रयत्न कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यामध्ये पोलिसांनी मोठे योगदान दिले. मतमोजणी दिवशी पोलीस प्रशासनाने लावलेला बंदोबस्त खूपच काटेकोर होता. भेदा चौक येथून प्रशासकीय इमाारतीकडे येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. तर विजय दिवस चौकातही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी प्रतिनिधी व्यतिरिक्त मतमोजणी केंद्रावर कार्यकर्ते येणार नाहीत याची पुरेपुर खबरदारी पोलिसांनी घेतली होती. त्यामुळे मतमोजणी प्र्रक्रिया सुरळीत पार पडली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!